
पण भाजपचे प्रशांत परिचारक; शहाजी पवार अजूनही वेटिंंगवरच…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मातब्बर नेत्यांना महायुती सरकारने महामंडळाचे वाटप करून ‘शांत’ करण्याचा प्रयत्न केला होता. महामंडळाच्या अध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले नव्हते. विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर महायुती पुन्हा सत्तेवर आली आहे. मात्र, आपल्या नेत्यांच्या नियुक्तीचा जीआर काढण्याचा विसर महायुतीला पडल्याचे दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या नियुक्तीचा जीआर काढला आहे. मात्र, भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांना अजूनही प्रतीक्षा आहे.
विधानसभा निवडणुकीतील संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी महायुती सरकारने तब्बल 27 महामंडळांवर संभाव्य इच्छुकांना अध्यक्ष म्हणून संधी दिली होती. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन नेत्यांचा त्यात समावेश होता. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची महाराष्ट्र रोजगार हमी परिषदेच्या, तर माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांची महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती. विधानसभेच्या घाईगडबडीत ह्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक काढण्यात आले नव्हते.
विधानसभा निवडणुकीत महायुती अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा राज्यात सत्तेवर आली. त्याला आता जवळपास वर्षभर होत आले आहे. मात्र, महामंडळाच्या वाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातब्बर नेत्यांना पक्षांकडून पुन्हा एकदा गोंजरण्यास सुरुवात झाली आहे.
उमेश पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचा गट नाराज झाला होता. त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजन पाटील यांची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी तातडीने हालचाली करत राजन पाटील यांच्या राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे परिपत्रक काढून महायुतीमध्ये बाजी मारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने राजन पाटील यांच्या नियुक्तीचा जीआर काढून आपल्या नेत्यांना सत्तेत सामावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपच्या नेत्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत परिचारक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाचे अध्यक्षपद, तर माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याकडे महाराष्ट्र रोजगार हमी परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक अजूनही निघालेले नाही, त्यामुळे जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.