
स्थानिक नेत्यांवर सोपवला निर्णय…
आघाडी करून लढायचं की, स्वबळावर त्याचा निर्णय तुम्ही स्थानिक पातळीवर घ्या. आघाडी करून लढणार असाल तर, विधानसभेसारखे मनपा निवडणुकीत जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत विषय घोळत ठेऊ नका.
ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत, त्यावर शिवसैनिकांना लढण्याची संधी द्या. कोणत्याही परिस्थितीत अहिल्यानगर मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा,” असा स्पष्ट आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर शहरातील काँग्रेसच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात प्रवेश केला. ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधले. पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, सचिव विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून किरण काळे यांना सत्ताधाऱ्यांनी तुरुंगात डांबलं. पण ते शरण गेले नाहीत. खासदार संजय राऊत यांना देखील तुरुंगात टाकलं होतं. सातत्याने शिवसेनेवर हे हल्ले होत आहेत. शिवसैनिक याला कदापि डगमगत नाहीत. काळे हे उत्तम संघटन कौशल्य असणारे धाडसी, अभ्यासू आहेत, असे कौतुक ठाकरेंनी काळेंचे केले. ठाकरेंनी काळेंशी निवडणुकीच्या तयारी बाबत सविस्तर चर्चा करत रस्ते घोटाळ्याबाबत माहिती घेतली. खासदार राऊत यावेळी उपस्थित होते. ठाकरेंनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना यावेळी त्यांना केल्या. निवडणूक रणनीतीबाबत चर्चा झाली.