
दैनिक चालु वार्ता भिगवण प्रतिनिधी :जुबेर शेख
भिगवण :-सन २०१७ मध्ये भिगवण येथील प्लॉट खरेदीबाबत फिर्यादी अक्षय एकनाथ दुधाळ रा मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे व आरोपी विकास सर्जेराव काळे रा. एमआयडीसी बारामती यांच्यामध्ये व्यवहार झालेला होता. सदर व्यवहारापोटी फिर्यादी अक्षय दुधाळ यांनी आरोपी विकास काळे यांना विसार म्हणून २,५०,०००/– दिलेले होते व उर्वरित रक्कम रू २,००,०००/- एक महिन्याने सदर प्लॉटच्या खरेदीखतावेळी देण्याचे साक्षीदारांसमक्ष ठरलेले होते. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते.सदरवेळी फिर्यादी यांनी आरोपी यांना सदर मिळकतीची विसार पावती करून द्या असे म्हणाले असता आपण जवळचे आहोत १ महिन्यात खरेदीखत करणार आहे जर खरेदीखत करून नाही दिले तर विसार म्हणून दिलेली रक्कम व्याजासह परत देईल असे आरोपीने सांगितलेले होते. परंतु पुढे सदर प्लॉट बाबत फिर्यादी यांनी चौकशी केली असता सदर प्लॉट हा दुसऱ्याच व्यक्तीचा असून त्यांनी यापूर्वीच विक्री केलेली आहे व सदर व्यवहारात त्याची फसवणूक झाली आहे त्यामुळे फिर्यादीने आरोपींला सदरची रक्कम परत देण्याबाबत तगादा लावला असता आरोपीने फिर्यादीला रक्कम रुपये २,५०,०००/- इतक्या रकमेचा भारतीय स्टेट बँक शाखा बारामती या बँकेचा चेक दिलेला होता सदरचा चेक मुदतीत खात्यात भरला असता आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे सदरचा चेक न वाटता परत आलेला होता त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी यांचेविरुद्ध बारामती न्यायालयात खटला दाखल केलेला होता. सदर खटला साक्षीपुराव्यावर चाललेला होता.
सदर खटल्यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधकारी बारामती श्री प्रशांत काळे साहेब यांनी दिनांक २०/९/२०२५ रोजी निकाल देऊन फिर्यादीची कायदेशीर रक्कम देण्यासाठी आरोपीने फिर्यादीला चेक दिलेला होता व तो न वाटल्यामुळे आरोपीने गुन्हा केला आहे हे शाबित झाल्यामुळे कोर्टाने आरोपीला चार महिने सश्रम कारावासाची शिक्षा व दंड म्हणून रक्कम रू २,५०,०००/- फिर्यादीला देण्याचा आदेश करून सदरची रक्कम न दिल्यास अधिकचा एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा आरोपीला दिलेली आहे.
सदर खटल्यामध्ये फिर्यादी अक्षय दुधाळ यांचेवतीने ॲड पांडुरंग जगताप, ॲड प्रणव लोदाडे, ॲड ज्योती जगताप, ॲड राहुल गवंड यांनी काम पाहिले होते.