
T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली ‘धोबीपछाड’…
आशिया चषक २०२५ स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माच्या भात्यातून आणखी एक अर्धशतक आले. अवघ्या २२ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घालताना त्याने अनेक विक्रम मोडीत काढले.
यात त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला धोबी पछाड देत मोठा कारनामा करून दाखवलाय.
अभिषेक शर्माचा मोठा धमाका
अभिषेक शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ३१ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी ८ चौकार आणि २ षटकाराने बहरलेली होती. चरित असलंकाने खेळीला ब्रेक लावण्याआधी त्याने मोठा डाव साधला.
मोहम्मद रिझवानचा रेकॉर्ड मोडला
पहिल्यांदाच टी-२० आशिया कप स्पर्धा खेळताना अभिषेक शर्मानं खास छाप सोडलीये. प्रत्येक सामन्यात धमाकेदार कामगिरीसह त्याने एकामागून एक विक्रम प्रस्थापित केले. आधी टी-२० आशिया कपमधील सिक्सर किंग होण्याचा डाव साधल्यावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात छोट्या फॉरमॅटमधील आशिया कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अभिषेक शर्मानं आपल्या नावे केला आहे. ६ सामन्यातील ६ डावात ३०९ धावा करत त्याने हा मोठा विक्रम आपल्या नावे केलाय. या आधी २०२२ च्या आशिया कप स्पर्धेत मोहम्मद रिझवान याने २८१ धावा केल्या होत्या.
आशिया कप स्पर्धेत असा पराक्रमक करणारा पहिला फलंदाज ठरला अभिषेक शर्मा
आशिया चषक स्पर्धेत सलग तिसरे अर्धशतक झळकावण्याचा डाव साधताना त्याने फायनलआधी ३०० धावांचा आकडा गाठला. टी-२० आशिया कप स्पर्धेतील एका हंगामात ‘त्रिशतकी’ झळकवणारा पहिला फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत अभिषेक शर्मानं २३ टी-२० सामन्यात ८४४ धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.