
चंद्रकांतदादांनी दिला सल्ला !
गोपीचंद पडळकर तुमचे रक्त थोडे गरम आहे. अतिशय डोक्याने चालायचे. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटील यांच्याविरुद्ध भाषण करायचे. जयंत पाटील यांच्या आई-वडिलांविरुद्ध बोलू नको.
जयंत पाटील यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोल, असा सल्ला सांगलीचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) नेते, जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. सांगली गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र संस्कृती’ असे म्हणत एक मोर्चाही काढला होता. यातच आता चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांना सल्ला देत जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाशीच्या मार्केट यार्ड मधील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करा, हे मी देवेंद्र फडणीस यांना सांगणार आहे, असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना इशारा दिला आहे.
सांगली जिल्हा बँकेचे चेअरमनने हे ‘महाराष्ट्र संस्कृती’ या मोर्चातून शिरा ताणून विचित्र आणि विशिप्त, विकृत भाषण केले. सांगली जिल्हा बँकेच्या गैर कारभाराची चौकशी लागलीच पाहिजे. बँकेची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे. याच्या आड माझं मंत्रिपदी येत असेल तर मी देवेंद्र फडणवीस यांना माझे मंत्रीपद काढून टाकण्यास सांगेल. आमदार म्हणून मी उपोषणाला बसतो. आता सोडणार नाही. जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची चौकशी झाली पाहिजे. मॉर्गेज नसताना वाढीव कर्ज दिलेल्याची चौकशी झाली पाहिजे. सर्वोदय कारखाना कोणी लाटला? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राजाराम बापू पाटील यांच्या बद्दल आमच्या मनात काही वैर नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे. पण, कुणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला आणि देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने दबला. त्या ऑनलाईन लॉटरीच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करावी लागेल, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.