
बीड येथे येवलावाला (मंत्री छगन भुजबळ) हे ओबीसी मेळावा घेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, म्हणून मेळावा घेणार आहात तर मग आमच्याकडे मते मागायला येऊ नका. या मेळाव्याला उपस्थित राहणारऱ्या नेत्यांवर आमचे लक्ष आहे, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (दि.२७)सकाळी येथे दिला.
प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन मराठा सेवकांना केले आहे. अशा परिस्थितीत दसरा मेळावा जसा होईल तसा होईल. ज्याला शक्य आहे तो येईल ज्याला नाही येऊ नये.
स्टंटबाज लोकांकडे लक्ष देण्यास वेळ नाही
बीड जिल्ह्यातील अन्य मेळाव्यांची जोरात तयारी सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, लोकांच्या मेळाव्यांचे आम्हाला देणेघेणे नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनांवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला झाल्याविषयी विचारले असता जरांगे म्हणाले की, स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते प्रसिद्धीसाठी स्वत:च्याच गाड्यावर हल्ले करून घेतात. या जातीवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायची गरज नसल्याचे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.
ओबीसी मेळाव्याला हजर राहणाऱ्या नेत्याला पाडा
मेळाव्याला आमची हरकत नाही पण आमचं बारीक लक्ष आहे. मंत्री भुजबळ यांचा येवल्याचा अलिबाबा असा उल्लेख केला. मराठा नेत्यांना पाडा असे भुजबळ म्हणाले होते. त्यामुळे आम्ही पण ओबीसी मेळाव्याला हजर राहणाऱ्या नेत्याला पाडा, असे म्हणणार असल्याचे जरांगे यांनी नमूद केले. यामुळे या मेळाव्याला बीड आणि राज्यातील कोणता नेता जातो, यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
मेळावा अजितदादा पुरुस्कृत
बीड येथे आयेाजित मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री अधिक असणार आहेत. यामुळे हा मेळावाच अजितदादा पुरस्कृत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.