आरोग्य आणि पोलिस खात्याचा नेमका वाद काय…
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मूळची जळगावमधील सलेल्या या डॉक्टरने भाऊबीज दिवशीच फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपले जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.
PSI गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचा आरोप
आत्महत्येपूर्वी डॉक्टरने हातावरच आत्महत्येचे कारण लिहून ठेवले होते. यानंतर सातारा पोलिस दलासह आरोग्य खात्यातही खळबळ उडाली. महिला डाॅक्टरने पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचाही उल्लेख आहे.
काय आहे हातावर लिहिलेला मजकूर?
हातावर लिहिलेला मजकुरात म्हटलं आहे की, ‘माझ्या मरण्याचे कारण PSI गोपाल बदने आहे. त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला 4 महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.’ या घटनेने फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
फडणवीसांकडून एसपींना फोनाफोनी
दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना फोन करून बलात्कारी पीएसआय गोपाल बदनेला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. तुषार दोषी यांनी एबीपी माझाशी बोलताना गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमधील असल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, आता पोलिसांसमोर आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. डॉक्टरने हे टोकाचे पाऊल का उचलले, हॉटेलमध्ये कशी पोहोचली, आणि तिच्या मृत्यूमागे आणखी कोणी जबाबदार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे पोलिस यंत्रणेतील घोटाळे आणि सत्तेचा गैरवापर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शवविच्छेदन अहवाल बदलून देण्यासाठी दबाव
दुसरीकडे, महिलेच्या काकांनी आणि आतेभावाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काकांनी आपल्या पुतणीवर सात्याने शवविच्छेदन अहवाल बदलून देण्यासाठी दबाव होता. त्यामुळे ती तणावात होती. त्यामुळे ती आयुष्य संपवणार असं म्हणत होती, असे सांगितले. आतेभावाने राजकीय वादात बहिणीचा बळी गेल्याचे म्हटले आहे. त्याने खासदारांच्या दोन पीएचा उल्लेख केल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.


