मराठा आरक्षणानंतर पहिल्यांदा एकत्र येण्यामागचं कारणही आहे खास…
मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान उपोषण करताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा अनेकांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते.देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना जरांगे पाटलांनी अनेकदा जहरी शब्दांचाही वापर केला.
याशिवाय त्यांची जीभही घसरली, त्यांनी फडणवीसांच्या आईवरूनही अपशब्द वापरले. दरम्यान, आता मात्र हे दोघे एका कार्यक्रमात एकमेकांबरोबर एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.
26 ऑक्टोबर 2025 रोजी मंळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. याच अनावरण सोहळ्यासाठी या दोन्ही नेत्यांची हजेरी लागणार आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, यामुळे सध्या राजकीय जगतात चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळते आहे.
पंढरपूर- मंगळवेढाचे भाजप आमदार समाधान अवताडे यांनी या सोहळ्याचे नियोजन केले आहे. ते म्हणालेत की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचेही मान्य केले आहे.” दरम्यान, या कार्यक्रमाला इतरही अनेक सर्वपक्षीय नेते, मंत्री खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबईतील आझाद मैदानातील जरांगेंचं आंदोलन त्यानंतर मिळालेलं मराठा आरक्षण या घडामोडीनंतर फडणवीस व जरांगे पाटील एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय महत्व वाढत आहे. पुतळा समितीच्या सदस्यांनीही जरांगे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबईतील जरांगेंच्या उपोषणावेळी मुख्यमंत्री आझाद मैदानावर गेले नव्हते. ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घेण सरकारला परवडणारे नव्हते त्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र, आता हे दोन नेते एका मंचावर येत असल्याने जोरदार चर्चांना पेव फुटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे व महाराष्ट्राचे दैवत असल्याने या कार्यक्रमाला अनेक नेते उपस्थित राहतील, यात शंका नाही. त्यामुळे फडणवीस- जरांगेही या एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत का नाही हे आपल्याला २६ तारखेला कळणार आहे.


