बावनकुळे बैठकीआधी अभिप्राय देऊ नका; मुंबईत येताच बच्चू कडूंनी सुनावलं…
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आपल्या शिष्टमंडळासह आज मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार आहे.
शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसह 22 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत. या मागण्यांबाबत काय ठरतं ते स्पष्ट होईलच. पण त्याआधी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानाबाबत पत्रकारांनी बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता, बच्चू कडू यांनी बावनकुळे यांना सुनावलं. “पुढची दिशा सर्व मिळून ठरवू. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीपूर्वी असं बोलू नये. तुम्ही चर्चेपूर्वी बैठकीचा अभिप्राय देणं चुकीचं ठरेल”, असं बच्चू कडू म्हणाले.
“मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत जे बोलणं झालं ते असं झालं की, आम्ही टायमिंग निश्चित करु. कर्जमुक्तीचं टायमिंग निश्चित करु असं सांगितल्यावर आम्ही बैठकीचा होकार दिला. आता टायमिंग निश्चितसाठीच ही लढाई होती. त्यासोबत किती कर्जमाफी करणार, कुणाची किती करणार या गोष्टींच्या चर्चेसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. त्यांनी टायमिंगबाबत आम्हाला आश्वासित केलं म्हणून आम्ही बैठकीसाठी मुंबईत आलो आहोत, अशी देखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
आंदोलन आम्ही केलं असेल तरी ते आंदोलन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं होत आहे, मेंढपाळांचं होत आहे, दिव्यांगांचं होत आहे, आम्ही नाममात्र आहोत. यामध्ये राजकारण नाही. तर शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत त्याची ही लढाई आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समजून घेतील एवढंच आम्हाला वाटतं”, अशी आशा कडू यांनी व्यक्त केली.
“ज्याला 70 हजार पेन्शन असेल, मोठा व्यापारी असेल, ते लोकं तिथे यायलाच नको. ते पैसे आमच्या गरीब शेतकऱ्याला कसे जातील याचा प्रयत्न झाला पाहिजे. आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही नकारात्मक भावना का विचारात घेऊ?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
आम्ही सरळ जेवण करु. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर जाऊ. तिथे आमची अंतर्गत बैठक घेऊ. कोणते मुद्दे कसे मांडावे याचा कार्यक्रम ठरवतो. सगळे माझ्यापेक्षा तज्ज्ञ आहेत. माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केलेले आहेत. त्यांचे अनुभव घेऊन आम्ही बैठकीला सामोरे जाऊ, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
न्यायालयाने रेल्वे रोकोच्या आंदोलनावर जो आदेश दिला त्यावरही बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “आता न्यायालयाचं किती ऐकायचं ते पाहू. आम्ही न्यायालयाचा अवमान करु इच्छुक नाहीत. पण तुम्ही एका बातमीवरुन आम्हाला उठायला सांगितलं. आमची भूमिका जाणून घेतली नाही आणि तुम्ही लगेच निर्णय घेतला. हे चुकीचं वाटतं. न्यायालयाबद्दल विश्वास कमी झाला तर आम्ही कुणाकडे जायचं? एवढ्या शेतकरी आत्महत्येच्या घटना होतात. न्यायालय त्यावर निकाल देत नाही. अपेक्षाभंग होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
आम्ही शेतकऱ्यांसाठी हा कमीपणा घेतला असला तरी मार्ग निघणं फार महत्त्वाचं आहे. मार्ग निघत नसेल तर आंदोलन करायला आम्हाला दुसऱ्या देशातून लोकं आणावे लागत नाहीत. आंदोलन कधीही करता येतं. आमचं बळ आहे. तशापद्धतीने आम्ही समोर जाऊ शकतो. आमचा आमच्यावर विश्वास आहे. आमच्या शेतकऱ्यांवर विश्वास आहे. मेंढपाळवर विश्वास आहे. पाच मिनिटांत तेवढ्याच ताकदीचं आंदोलन उभं करु. काहीच विषय नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री महोदय, तुमच्याबाबत काही शेतकऱ्यांचे गैरसमज झाले ते दूर करण्याची संधी आहे. लोकं तुम्हाला म्हणतात की, भाजपवाले ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफीची घोषणा करणार. तो डाग पुसायचा असेल तर आता कर्जमाफीची घोषणा करावी, अशी विनंती त्यांनी केली.
आता आम्ही चांगल्या मूडमध्ये जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांवर अधिक टीका करण्यापेक्षा त्यांनी सकारात्मक व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. कुठलाही श्रेयवाद नाही. जर कर्जमाफीची घोषणा झाली तर त्याचं पूर्ण श्रेय सरकारला जाईल. आम्ही श्रेय घेऊ इच्छित नाही. माझा शेतकरी अडचणीत आहे. राजकारण कर इच्छित नाहीत. त्या फासावर जाणाऱ्या शेतकऱ्याचे आशीर्वाद फडणवीस यांनी घ्यावेत, असं बच्चू कडू सरकरला उद्देशून म्हणाले.


