महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खेळी !
सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता विविध पक्षांकडून रणनिती आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा शर्मा मुंडे यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. करुणा मुंडे यांनी मराठा आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांना एक मोठी आफर दिली आहे. ज्यामुळे सध्या त्या चर्चेत आहेत.
मोठ्या घराण्याची सून असताना मलाच पक्ष काढावा लागला
करुणा मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी पक्ष काढण्यामागील कारणही स्पष्ट केले. मी आज एका मोठ्या घराण्याची सून आहे. त्या घराण्याचे नाव संपूर्ण भारतात गाजत आहे. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे अशा मोठ्या घराण्याची मी सून असताना मलाच पक्ष काढावा लागला. मी कोणी लहान नाही. मी ४५ वर्षांची स्त्री आहे. तरीही मला पक्ष काढावा लागला. न्याय भेटत नाही. महिलांना जेलमध्ये टाकत आहेत. ज्या लोकांच्या छातीवर लाथ मारुन हे लोक मंत्री होतात, आमदार, खासदार होतात, त्यांच्या आई-वडिलांनाही जेलमध्ये टाकण्यात आले आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी विनंती
यानंतर त्यांना तुम्ही मनोज जरांगेंची मदत मागणार का, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी मी मनोज जरांगे यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक निवेदन घेऊन गेली होती. या निवेदनात मी मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती केली होती, असे सांगितले.
“जरांगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे. आपल्याला महाराष्ट्रात कायतरी बदल घडवायचा आहे, त्यामुळे तुम्ही माझे निवदेन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा. मला पार्टीचे कोणतेही पद नको, कोणतेही तिकीट नको. हे निवदेन मी सोशल मीडियावर टाकलेले आहे. नवीन लोकांना संधी द्या. महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या, असे करुणा मुंडे म्हणाल्या.
करुणा मुंडे यांच्या या महत्त्वपूर्ण ऑफरवर मनोज जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. मनोज जरांगे पाटलांनी हे निमंत्रण नम्रपणे नाकारले. ते समाजकारणी असल्यामुळे समाजासाठी लढण्यास प्राधान्य देतील. मी एक समाजकारणी माणूस आहे. मी समाजासाठी लढतो. त्यासाठी त्यांनी माझ्या निवेदनाला नकार दिला होता, असा खुलासा करुणा मुंडेंनी केला होता.


