पुरावे देत पार इज्जतच काढली !
भारतीय लष्कराचे कर्नल (निवृत्त) शैलेंद्र सिंग यांनी एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात पाकिस्तानी संरक्षण तज्ज्ञ कमर चीमा यांच्या राफेल जेट्स पाडल्याच्या खोट्या आणि निराधार दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली.
भारत-अमेरिका संरक्षण करारावर चर्चा सुरू असताना, चीमा यांनी भारताच्या मिग-२१ विमानांची निवृत्ती, अमेरिकेने इंजिने पुरवण्यात केलेला विलंब आणि कथित ‘विमाने पाडल्या’च्या घटनांचा संदर्भ देत भारतीय हवाई दलावर दबाव असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला. कर्नल शैलेंद्र सिंग यांनी त्यांच्या या ‘मुंगेरी लालच्या गोड स्वप्नां’ना सडेतोड उत्तर दिले.
पाकिस्तानी तज्ज्ञांचे निराधार दावे
कमर चीमा यांनी भारतीय हवाई दलाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दावा केला की, तेजस लढाऊ विमानांसाठी अमेरिकेने ११३ इंजिने पुरवण्यात आधी विलंब केला. भारताच्या मिग-२१ विमानांची निवृत्ती आणि ‘काही जेट विमाने पाडल्यामुळे’ भारत अडचणीत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये पाकिस्तानने चार राफेल, एक मिग-२९, एक सुखोई-३० आणि एक हेरॉन यूएव्ही ड्रोन पाडले. कर्नल शैलेंद्र सिंग यांच्या उपरोधिक प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाडलेल्या राफेलची संख्या वाढवून ‘सात’ असल्याचे सांगितले, आणि त्यासाठी पंतप्रधानांचा हवाला दिला.
कर्नल शैलेंद्र सिंग यांचे सडेतोड प्रत्युत्तर
कर्नल शैलेंद्र सिंग यांनी चीमा यांच्या दाव्यांना अत्यंत कठोरपणे आणि पुराव्यानिशी खोडून काढले. कर्नल सिंग यांनी चीमांच्या ‘राफेल पाडल्या’च्या दाव्याला “मुंगेरी लालची गोड स्वप्ने” असे उपरोधिकपणे संबोधले. त्यांनी व्यंगात्मकपणे विचारले, “तुम्ही टायर कापला का, ट्यूब पंक्चर केली का किंवा तुम्ही काय केले?” सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कर्नल सिंग यांनी स्पष्ट केले की, चीमा यांनी यापूर्वी ज्या तीन राफेल टेल नंबर्सचा उल्लेख केला होता, ते राफेल ऑपरेशन सिंदूर दरम्यान नव्हे, तर एका आंतरराष्ट्रीय सरावादरम्यान दुसऱ्या देशात उडताना दिसले होते. अशा प्रकारे त्यांनी पाकिस्तानचे दावे पुराव्यानिशी खोटे ठरवले. त्यांनी चीमा यांना मॅक्सार कंपनीकडून उपग्रह प्रतिमा मागवण्याचा सल्ला दिला, जेणेकरून सत्य जगासमोर येईल.
‘६-०’ चा प्रत्युत्तर
चीमा यांनी सात विमाने पाडल्याचा दावा केल्यावर, कर्नल सिंग यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा गोलंदाज हरिस रौफने आशियाई विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान केलेला “६-०” चा इशारा आणि विमान उडवण्याचा हावभाव आठवण करून दिली. त्यांनी विचारले की, “मग तुमच्या आयएसआयने तुमच्या क्रिकेट संघाला ६-० असे का सांगितले?” या लाइव्ह कव्हरेजमधील कृतीमुळे पाकिस्तानचे दावे खोटे ठरतात, असे त्यांनी ठणकावले.


