वडगावमध्ये फाटलं; राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षांच्या घरातच उमेदवारी…
महायुतीधील मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा समाना होण्याची चिन्हे होती. मात्र, लोणावळा आणि तळेगावमध्ये युती झाल्याने ही लढत टळल्याचे सांगितले जात होते.
मात्र, वडगाव नगरपंचायतीमध्ये युती फिस्कटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून वडगाव नगराध्यक्षपदासाठी अबोली ढोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवत स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी तळेगाव आणि लोणावळा या ठिकाणी भाजपशी जुळवून घेतले. वडगावमध्ये मात्र त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदासाठी अबोली ढोरे आणि सुनीता कुडे इच्छुक होत्या. प्रथम ढोरे यांना आणि नंतर कुडे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे.
माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या घरातच नगराध्यक्षपदाची संधी देत त्यांच्या पत्नी अबोली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांचा कालावधी निश्चित करून त्यांच्यानंतर सुनीता कुडे यांना संधी देण्यात येणार आहे.
उमेदवार यादी जाहीर करणार
वडगाव नगरपंचायतीची निवडणूक दोन डिसेंबरला होणार आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की वडगाव शहरात सुमारे 100 कोटींचे कामे सुनील शेळके यांनी अजितदादांच्या पाठबळामुळे केली आहेत. आमच्याकडे 17 प्रभागात अनेक इच्छुक आहेत. पक्षाकडून उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करू.


