स्वबळावर लढण्याचा नारा !
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तब्बल 60 जागांवर लढणाऱ्या काँग्रसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. बिहारच्या निकालानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने युती-आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. तिच भूमिका आम्ही काँग्रसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासमोर मांडल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
मनसेसोबत उद्धव ठाकरे जात असल्याने काँग्रेस स्वबळाचा नारा देत असल्याचे वर्षा गायकवाड यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, आम्ही संविधान माननारे लोक आहोत. सर्वांना सोबत घेण्याची आमची भूमिका असते. विकासावर आम्ही बोलणारे आहोत. मुंबईकर आहोत. लोकांना मारणे आम्हाला मान्य नाही.
समविचारी पक्षांशी चर्चा करणार
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही समविचारी पक्षांसोबत चर्चा करणार आहोत. आरपीआयचे काही गट यांना आम्ही सोबत घेऊ तसेच आमची नैसर्गीक युती शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी असते आम्ही त्यांच्यासोबत देखील चर्चा करू, असे सांगत स्वबळावर लढण्याची घोषणा देणारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि आंबेडकरीवादी वादी पक्षांसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले.


