राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, निवडणूक आयोगाकडून राज्यात नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, त्यानुसार येत्या दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच पक्षांतराला चांगलाच वेग आल्याचं पहायला मिळालं, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवसापर्यंत या निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश सुरू असल्याचे पहायला मिळत आहे, त्यामुळे ऐनवेळी उमेदवार शोधताना पक्षश्रेष्ठींना तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त इनकमिंग भाजपात झाल्याचं पहायला मिळालं, भाजपने आपले मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील काही नेते देखील आपल्या पक्षात घेतले आहेत. मात्र आता चंद्रपुरातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे चंद्रपुरात भाजपलाच मोठा धक्का बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे. भद्रावती, राजुरा, वरोरा आणि गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करत काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली आहे, तर दुसरीकडे राजुरा नगर परिषदेत भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश करताच त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
वरोरा नगरपरिषदेत भाजपाच्या बंडखोर उमेदवार वसुधा वरघणे यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माया राजुरकर यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. तर गडचांदूर नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्या विरोधात निलेश ताजणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


