नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी, त्यांनी राष्ट्रवादीवर बोचरी टीका करत स्वबळाचा नारा दिला होता.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सावंत यांनी अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात काम केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात महायुतीमधील मित्रपक्ष काही ठिकाणी एकमेकांविरोधात नगरपालिकेची निवडणूक लढवत असल्याने स्थानिक वातावरण चांगलेच तापले आहे.
वर्षभरापूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात महायुती असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या 60 आमदाराविरोधात काम केले, असा नवा गौप्यस्फोट शिवसेना नेते माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी परंडा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
तसेच, माझ्याही मतदारसंघात शरद पवार व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महायुतीत असताना एकत्र लढले. मात्र माझ्या विरोधात त्यांनी काम केले असल्याचा आरोप यावेळी सावंत यांनी केला. त्यामुळे मी टीका केल्यावर त्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या टीकेला त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे.


