नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला धक्का बसला आहे. राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच अर्ज अवैध ठरला आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकला गेला.
राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नऊ उमेदवारांचे 11, तर नगरसेवकापदासाठी 170 पैकी 147 अर्ज वैध ठरले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे राहुरी नगरपरिषदेमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार ईश्वर मासरे यांचा अर्ज अवैध ठरले. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या नगरसेवक पदाच्या 24 पैकी 14 अर्ज वैध ठरले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पॅनल अर्धावर आला आहे. यात, नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
राहुरी नगरपरिषदच्या कार्यालयात मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नामदेव पाटील, मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. प्रभाग 1 ते 12 क्रमाने अर्जांची छाननी झाल्यावर शेवटी नगराध्यक्षपदाच्या अर्जांची छाननी झाली. त्यानंतर त्रुटींवर सुनावणी झाली.
उमेदवारांची अर्जावर आवश्यक ठिकाणी स्वाक्षरी नाही, शपथपत्रावर स्वाक्षरी नाही, जेथे पाच सूचक आवश्यक आहेत, तेथे एक सूचक दिले आहेत, जोडपत्र एक किंवा दोन जोडलेले नाही, जोडपत्र दोनमध्ये नावाचा उल्लेख नाही, अशा प्रमुख कारणांमुळे उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार सखाहरी बर्डे यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पवार आणि तनपुरे गटाच्या विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांच्या जात पडताळणीच्या दाखल्यावर आक्षेप घेतला. राहुरीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती (पुरुष) आरक्षित आहे.
अनुसूचित जमातीमध्ये ‘महादेव कोळी’ जमात आहे. पवार आणि मोरे उमेदवार फक्त कोळी आहेत. ते महादेव कोळी नाहीत, असा त्यांचा आक्षेप होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बर्डे यांचा आक्षेप फेटाळून लावला. त्यामुळे बर्डे यांनी आदिवासी जमातीवर अन्याय झाल्याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.


