शिंदेंची नाराजी; दिल्लीत 50 मिनिटं चर्चा; भाजपश्रेष्ठी काय म्हणाले ?
मुंबई : मित्रपक्षांतील फोडाफोडीच्या राजकारणावरून मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीआधी शिवसेनेत नाराजीनाट्य रंगल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी थेट दिल्लीची वाट धरली.
येथे त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत पक्षांतराबाबत शिवसेनेच्या नेत्यांमधील नाराजीला वाट करून दिल्याचे कळते. ‘काही नेते वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळत आहे,’ असेही त्यांनी शहा यांना सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत एकसंधता राहावी, या दृष्टीने सध्याच्या घडामोडींबाबत शिंदे यांनी शहा यांच्याशी सुमारे ५० मिनिटे चर्चा केली. भाजप व शिवसेना यांच्यात सुरू झालेल्या अंतर्गत वादाच्या नाट्याचा हा पुढचा अंक मानला जात आहे. ‘विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र काही नेत्यांमुळे युतीच्या विजयी घोडदौडीत विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असे शिंदे यांनी शहा यांच्यासमोर स्पष्ट केले.
‘मी लढणारा आहे, रडणारा नाही,’ असेही त्यांनी अधोरेखित केले. ‘यातून मार्ग काढू या आणि विजयाची घोडदौड निश्चित करू या,’ असे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचे समजते. ‘राज्यात युतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो. या गोष्टीची जाणीव भाजप नेत्यांना करुन देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे,’ अशा शब्दांत शिंदे यांनी मुंबईतही नाराजी व्यक्त केली होती.
शिंदे दिल्ली विमानतळावर उतरून आपले पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास ते शहा यांच्या ६-कृष्ण मेनन मार्ग या निवासस्थानी दाखल झाले. ‘काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीने काम यापुढे होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतील नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे,’ असे म्हणणे शिंदे यांनी मांडल्याचे समजते.
शिंदे बिहार दौऱ्यावर
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी पाटणा येथील गांधी मैदानात होणार आहे. त्यासाठी शिंदे यांना निमंत्रण असून ते त्यासाठी बिहारला जाणार आहेत. मात्र महायुतीतील घडामोडींची माहिती भाजप नेतृत्वाला देण्याच्या हेतूनेच ते दिल्लीत एक दिवस आधी दाखल झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी तेथे दोन सभा घेतल्या होत्या.
फडणवीस-पवार बैठक
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेना पक्षातील मंत्री आणि एकनाथ शिंदे यांची वाढती नाराजी दूर कशी करायची, नाराजी वाढत गेली, तर पुढे काय करायचे, याबाबतही बैठकीत मंथन झाल्याचे समजते.
काँग्रेसचे शहराध्यक्ष शिवसेनेत
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्यात काँग्रेसला धक्का दिल्याचे समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात शिवसेनेने काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांना पक्षात घेतले आहे. त्यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.


