रक्ताचं पाणी करुन जिंकायचंय, भाजपविरोधात नीलेश राणेंचा एल्गार…
तळकोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा यांची महायुती झालेली नाही. तर शिवसेना नेते नीलेश राणे यांनी कणकवली शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी असलेले माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हे कणकवली शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार नीलेश राणे हे ठाकरे गटाच्या नेत्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. जीवाचं रान करु, रक्ताचे पाणी करू, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण या कणकवली शहर विकास आघाडीला नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि नगरसेवकांना निवडून आणू, असा पणच नीलेश राणे यांनी बोलताना व्यक्त केला.
संदेश पारकर व कणकवली शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसाठी झालेल्या सभेत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते. नीलेश राणे यांनी कणकवली येथे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या जाहीर सभेत केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. संदेश पारकर यांच्या रुपाने सिंधुदुर्गच जिंकणार, समोर कोण आहे याचा विचार करू नका, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत निलेश राणे आता थेट रणांगणात उतरले आहेत. यावेळी व्यासपीठावर सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आदी उपस्थित होते.
नीलेश राणे पुढे म्हणाले की, महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाने विचारले की अरे कृष्णा सगळे आपलेच आहेत समोर, तेव्हा श्रीकृष्णाने उत्तम उत्तर दिलं की ते आपलेच आहेत तर समोर का आहेत, ते आपल्याबरोबर असले पाहिजेत, असं उदाहरण देत नीलेश राणेंनी सांगितलं की पण ते राजकारण वेगळं आहे, त्या राजकारणात आपल्याला पडायचं नाही, आपली चर्चा फक्त विकासात्मक व्हायला पाहिजे, उद्या शहराचा विकास करू शकेल तर संदेश पारकरच करू शकेल, नगरसेवक करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आता मीच मैदानात उतरलोय…
सगळ्यांनी कामाला लागा, कोणाच्या आदेशाची वाट पाहू नका, कोण कुठे येईल, त्याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत, आम्ही सगळे आणि बाकीचे पण रथी-महारथी येणार आहेत, तुम्ही काही काळजी करू नका,सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार आणि आता मीच मैदानात उतरलोय तर अजून तुम्हाला कोण हवेय, त्यांना पण सगळ्यांना आणू द्या, संदेशजी पारकर तुम्हाला निवडून येण्यासाठी जीवाचे रान करू, पण तुम्हाला शंभर टक्के निवडून आणू असा शब्द निलेश राणे यांनी दिला.
तर फक्त फोन करा…
या कणकवलीमध्ये झेंडा हा शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे, यासाठी कुठेही कमी पडू नका आणि आता आपण तुमच्या बरोबर आहे, कोणी आला तर फक्त फोन करा, असं सांगत दोन मिनिटांचा पॉज घेत ते पुढे म्हणाले की कोणी येण्याची शक्यता नाही. मालवण असेल, वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल, सगळीकडे झेंडे आपलेच लागणार, गुलाल आपलाच उडणार आणि फटाकेदेखील आपलेच वाजणार असा विश्वास व्यक्त केला. कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर यांच्यासाठी आपण मैदानात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही निवडणूक किंवा विकासाच्या मुद्द्यावर होईल असे सांगत संदेश पारकर तुम्ही निवडून आलात की कणकवली शहर विकासासाठी नगरविकास मंत्री आहेत हे नगर विकास खातं ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून लागेल तो निधी आणू, असा शब्दही त्यांनी दिला.


