अजितदादा व सुनेत्राआत्या माझे नातेवाईक; त्याचप्रमाणे…
तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिटू गंगणे यांना तुळजापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
यावरून भाजपावर टीका होत असतानाही गंगणे यांच्या नावाला पक्षाकडून देण्यात आलेली पसंती भुवया उंचवायला लावणारी आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. तसेच यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं होतं. त्याला आता राणा जगजितसिंह पाटलांनी उत्तर दिलं आहे.
राणा पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना एक पत्र लिहून ते फेसबूकवर शेअर केलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की “खासदार सुप्रिया सुळेजी, उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे. मात्र, काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहीरपणे सलग वक्तव्ये करीत आहात.
राणाजगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना खरमरीत पत्र
तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, “तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते.


