भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर केलेली टीका म्हणजे “भलत्याच घरचा राग आपल्याच लोकांवर काढणे” याचे उत्तम उदाहरण आहे.
स्वतःच्या अपयशाची भांडी झाकण्यासाठी दुसऱ्यांवर चिखलफेक करणे हेच त्यांच्या राजकारणाचे ‘नवनीत’ झालं आहे असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
अमोल मातेले म्हणाले की, अमित साटम यांनी आरोपांची तोफ झाडली, पण तथ्य मात्र चुकूनही उघड केले नाही. घरचे दिवे काळोखे अशी त्यांची गत आहे. मुंबई महापालिकेत २० वर्षे उपमहापौर भाजपचा होता. साटम ठाकरे यांच्या २० वर्षाच्या सत्तेवर चर्चा करतात, पण महापालिकेतील २० वर्षांचा उपमहापौर हा भाजपचाच होता हे ते सोयीस्करपणे विसरतात. आपलं पाप झाकायला दुसऱ्यावर आरोप करणं सोपं असतं असा टोला त्यांनी अमित साटम यांना लगावला.
तसेच मागील चार वर्षांचा प्रशासक राज नियंत्रण तुमच्याकडे आहे. तरीही काम शून्य आहे. आज महापालिका पूर्णपणे राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली आहे. चार वर्षे पालिकेवर भाजपाचा अघोषित ताबा आहे पण खड्डेमय रस्ते, रुग्णालयांची अवस्था दयनीय आहे. पाणीटंचाई कायम, शाळा व क्रीडांगणांचे प्रश्नही सुटले नाहीत. त्यावर न बोलता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे बोट दाखवून काय साधणार आहात? काम नसेल तर नुसती ओरड कोण करू शकतो हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद असा खोचक चिमटाही राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपाला काढला आहे.
दरम्यान, कूपर हॉस्पिटलचे नाव घेताच शांतता कारण तिथे ‘काम’ नाही, फक्त ‘वचने’ आहेत. स्वतःच्या मतदारसंघातील कूपर हॉस्पिटलची दैना पाहूनही एक शब्द काढायची हिंमत अमित साटम दाखवत नाहीत. मुंबईकरांना भेटी-गाठी नव्हे, सुविधा हव्यात पण ती देण्याची जबाबदारी कोणाची? मुंबईकरांना सुविधा कोणी द्यायच्या? ज्या महापालिकेवर तुमचे नियंत्रण आहे, त्यांनीच ना? रस्ते, शाळा, रुग्णालये व पाणीपुरवठा इथे तुमचा रिपोर्ट कार्ड ‘गुलाबी’ नाही, तो पूर्ण पांढरा कोरा आहे. आज दोन्ही ठाकरे एकत्र बसले, बोलले तर भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण होते. ठाकरेंच्या २० वर्षाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह लावतात, पण त्या काळात भाजपाची सत्तेत भागीदारी आणि भूषवलेले उपमहापौरपद ते विसरतात. इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या २० वर्षांच्या उपमहापौरपदाची आणि ४ वर्षांच्या प्रशासक राजची हिशोबाची वही आधी उघडा अशी मागणीही राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे.


