गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये कोल्ड वॉर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण यांच्यातील हा वाद आता चव्हाट्यावर आला असून या दोन्ही पक्षातील वादाचे नेमके कारण आता समोर आले आहे.
भाजपाने गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी यांना आपल्या पक्षात घेत शिंदे गटाला खिंडार पाडले आहे. त्यामुळे संतापलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट नाराजी व्यक्त करत मंगळवारी (ता. 18 नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील या वादामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. याचबाबत आता शिवसेना ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला असून भाजपाचा चेहरा पुन्हा समोर आल्याचे शिवेसना ठाकरे गटाने सामना या मुखत्रपत्रातील अग्रलेखातून म्हटले आहे.
फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपावर टीकास्त्र डागत ठाकरे गटाने म्हटले की, शिंदे गटाचा म्हणे मंगळवारी नाराजीचा स्फोट झाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची हिंमत या लोकांत खरेच आहे काय? शिंदे यांच्या पक्षाचे लोक भाजपावाले फोडत आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपावाल्यांकडून ‘ऑपरेशन लोटस’ घडवून मित्रपक्षांनाच सुरुंग लावला जात आहे. अर्थात, त्यात नवीन काय आहे? भाजपावाल्यांचे राजकारण दशकानुदशके असेच सुरू आहे. तरीही या फोटोफोडीचे हादरे शिंदे गटाला जास्त बसले असावेत. त्या अस्वस्थतेतूनच नाराजी नाट्याचा आणखी एक फसलेला प्रयोग पार पडला असावा, असा टोला ठाकरे गटाने लावला आहे.
तर, नाराजी नाटकाचे अंक खुद्द शिंदे यांनी यापूर्वीही सादर केले आहेत. कधी रुसून साताऱ्याला स्वतःच्या शेतात जाऊन बस, तर कधी दिल्लीत जाऊन मोदी-शहांकडे रडकथा सांग. मात्र त्याचा भाजपावर कितपत परिणाम झालाय हे भाजपावाल्यांकडून ठिकठिकाणी सुरू असलेल्या फोडाफोडीतून दिसतेच आहे. तरीही मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मिंधे गटाने हा नाराजी नाट्याचा नवा प्रयोग केलाच. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदेंच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजपा युती धर्म पाळत नसल्याचे बिन आवाजाचे लवंगी फटाके फोडले. मुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यांचे खास ठेवणीतले ‘फडणविसी हास्य’ करीत तिथल्या तिथे त्यांच्या फटाक्यांच्या वाती काढून घेतल्या आणि शिंदे गटाला त्यांनी केलेल्या फोडाफोडीचा आरसा दाखवला, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.
तसेच, भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र यासंदर्भात खास ‘भाजपाई’ खुलासा केला. ‘भाजपाई’ म्हणजे आधी गळ्यात गळे घालायचे, मग तोच गळा हळूच कापायचा आणि वर आपण काहीच न केल्याचा आव आणायचा. स्वतः मुख्यमंत्री एकीकडे महायुती अभेद्य आहे, असे सांगतात आणि दुसरीकडे युती-आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर होतील, असा ‘भेद’ करतात. पक्षाच्या बैठकीत बोलताना ‘मित्रपक्ष आपलेच आहेत याचे भान ठेवा,’ असे उपदेशामृत पदाधिकाऱ्यांना पाजतात आणि त्याच पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्ष फोडला तर त्याकडे कानाडोळाही करतात. आता मंगळवारच्या नाराजीनंतरही शिंदे गटाला चार गोष्टी सुनावत ‘आधी झाले ते झाले, इथून पुढे महायुतीमधील पक्षाचे नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करणार नाहीत,’ अशा शब्दांत समजूत घालून त्यांची पाठवणी केली. पुन्हा हा खुलासा मुख्यमंत्र्यांनी नव्हे, तर भाजपाचे मंत्री बावनकुळे यांनी केला. तो त्यांनी का केला? हा प्रश्न नाही, परंतु त्यानिमित्ताने अनेक तोंडी भाजपचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला, असे म्हणत ठाकरे गटाने भाजपावर टीकास्त्र डागले आहे.


