नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीत शिवसेनेतील नेते भाजपमध्ये जात आहे. शिवसेनेतील गळती सुरुत आहे. याबाबत शिवसेनेचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.
यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
शाह यांच्या भेटीत शिंदे यांनी तक्रारींचा पाढा वाचला आहे. यावरुन ‘सामना’मधून टीका केली आहे. “मिंधे यांच्या पक्षाचे लोक भाजपवाले फोडत आहेत. राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवाल्यांकडून ‘ऑपरेशन लोटस’ घडवून मित्रपक्षांनाच सुरुंग लावला जात आहे. अर्थात, त्यात नवीन काय आहे? भाजपवाल्यांचे राजकारण दशकानुदशके असेच सुरू आहे. तरीही या फोटोफोडीचे हादरे मिंधे गटाला जास्त बसले असावेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मिंधेंच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजप युती धर्म पाळत नसल्याचे बिन आवाजाचे लवंगी फटाके फोडले. मुख्यमंत्र्यांनी म्हणे त्यांचे खास ठेवणीतले ‘फडणविसी हास्य’ करीत तिथल्या तिथे त्यांच्या फटाक्यांच्या वाती काढून घेतल्या आणि मिंधे गटाला त्यांनी केलेल्या फोडाफोडीचा आरसा दाखवला. खरे-खोटे त्या दोघांनाच माहीत, परंतु नंतर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र यासंदर्भात खास ‘भाजपाई’ खुलासा केला, अशा शब्दात ताशेरे ओढले आहे.
मुळात जे स्वतःच आईच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी दुसऱयाच्या वळचणीला गेले आहेत त्यांना फोडफोडीवरून बोंब ठोकण्याचा, नाराजीचा राग आळवण्याचा नैतिक अधिकार आहे का? तो तुमचा तुम्हीच गमावला आहे आणि भाजपवाल्यांना हे पक्के माहीत आहे. त्यामुळेच ते आधी लचके तोडतात आणि नंतर ‘आता एवढाच, यापुढे नाही,’ असे म्हणत मलमपट्टीचे नाटक करतात. भाजपवाल्यांनी जी ‘इथून पुढे नाही’ची जी फुंकर घातली ती याच जातकुळीची आहे आणि मिंधे व त्यांच्या चेल्याचपाट्याना दुसरा पर्याय तरी कुठे आहे? तेव्हा ‘ऑपरेशन लोटस’ वगैरेच्या नावाने त्यांनी गळा काढण्यात काहीच अर्थ नाही, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
भाजपवाल्यांच्या डोळ्यांत जराही जात नाही. तुम्ही सत्तेत जरूर आहात, पण भाजपवाले ना तुम्हाला ‘राजी’ करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या ‘नाराजी’ला भीक घालतात. मिंधे गटाने जे पेरले त्याची फळे त्यांना मिळत आहेत. त्यामुळे ‘भोगा आपल्या कर्माची फळे’ इतकेच आम्ही सांगू शकतो, असा सल्ला शिंदेसेनेला दिला आहे.
काय म्हटले आहे ‘सामना’च्या अग्रलेखात
‘कमळा’च्या पाण्याखाली न दिसणाऱया जाळय़ात तुम्हीच तुम्हाला आपखुशीने अडकवून घेतले आहे.
ते जाळे तुमचा गळा हळूहळू आवळणारच आणि पाण्यावरील ‘कमळ’ डौलात डुलणारच.
भाजपने तुम्हाला फोडले तेव्हा आनंदाने आणि सत्तालोभाने स्वतःला फोडून घेतले.
आता भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार?
तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे आणि प्रत्येक वेळी ही धूळ जशी उडते तशीच खाली बसते.


