कोकणात राणेंची सर्वात मोठी राजकीय खेळी; थेट महायुतीला चॅलेंज !
राज्यात नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांवरुन राजकारण तापले आहे. येत्या २ डिसेंबरला कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. त्यातच आता कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महायुतीतील भाजप-शिंदे गटातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी महायुतीतून फारकत घेत ठाकरे गट आणि शिंदे गटासोबत युती करत शहर विकास आघाडीची सूत्रे हाती घेतली आहेत. यावेळी त्यांनी कणकवलीत युती न होण्यास बाहेरच्या शक्ती जबाबदार आहेत, असा थेट आरोप केला आहे. तसेच नारायण राणे यांच्या संमतीने कणकवलीत शहर विकास आघाडीचा झेंडा फडकवणार असल्याचे जाहीर केले आहे.
याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी महायुतीतील युती तुटण्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. त्यांना आमच्यासोबत युती करायची नव्हती. ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे, त्यांच्यासोबत युती झाली. म्हणून मी प्रचारासाठी कणकवलीमध्ये आलो आहे, असे निलेश राणे म्हणाले.
कणकवली जिल्ह्यात युती होऊ नये म्हणून बाहेरून विरोध होता, जिल्ह्यातून नव्हता, असे सांगत त्यांनी युती तुटण्याचे मूळ कारण भाजपचे स्थानिक नेते नसून वरिष्ठ असल्याचे संकेत दिले आहेत. याबद्दल भाजपचे पालकमंत्री आणि त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले. नात नात असतं, ते तुटत नाही, तुटणारही नाही. भाजपाच्या वरच्या स्तरातून निर्णय घेतले गेले. राणे साहेबांना सांगून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिले.
राणे साहेबांची आणि शिंदे साहेबांची परवानगी घेऊन आम्ही इथे आलो
नारायण राणे साहेब अजूनही युतीसाठी आग्रही आहेत. पण आता युती होईल असे वाटत नाही. त्यामुळे साहेबांनी तुम्ही थांबू नका, तुमचाही मोठा पक्ष आहे असे सांगितले आहे. राणे साहेबांची आणि शिंदे साहेबांची परवानगी घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत. लपून छपून नाही, असेही नितेश राणेंनी म्हटले.
दरम्यान शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचार सभेला अभूतपूर्व गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. या गर्दीचे कौतुक करताना निलेश राणे यांनी कणकवलीला विकासाची गरज असल्याचे अधोरेखित केले. राजकारणातील नाक म्हणजे कणकवली होय. आज कणकवलीला विकासाची गरज असून, नगरविकास खात्याकडून मोठा निधी कणकवली शहरासाठी देणार असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी संदेश पारकर यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत, “संदेशजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे आवाहन केले. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला हवी, अशी भूमिका घेत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
गुलाल आपलाच उडणार; फटाके आपलेच फुटणार
कणकवलीत झेंडा शहर विकास आघाडीचा लागणार. गुलाल आपलाच उडणार; फटाके आपलेच फुटणार,” असा विजयी नारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि इतर तीन ठिकाणी शिवसेनेचा झेंडा लागणार आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला. विशेष म्हणजे कणकवलीतील हे नवे राजकीय समीकरण म्हणजेच शहर विकास आघाडीचा पॅटर्न राज्यभर देखील होऊ शकतो, असे सूचक विधान करून त्यांनी आगामी काळात राज्यातही अशा स्थानिक आघाड्या होण्याची शक्यता वर्तवली आहे.


