आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथील श्री सत्य साई बाबा मंदिरात जन्मशताब्दी समारंभाचे आज (19 नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले होते. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी उपस्थिती लावली.
दरम्यान, या समारंभाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये दिसते की, ऐश्वर्या राय बच्चन हिने व्यासपीठावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली आणि त्यानंतर तिने जाती आणि धर्मावर भाषण केले.
समारंभात उपस्थितांना संबोधित करताना ऐश्वर्या राय बच्चन हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि सत्य साई बाबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा केली. तिने म्हटले की, “या खास प्रसंगी आमच्यासोबत याठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. त्यांचे प्रेरणादायी शब्द ऐकून मला खूप आनंद झाला आहे. या शताब्दी समारंभात मोदींची उपस्थिती आपल्याला श्री सत्य साई बाबांच्या शिकवणीची आठवण करून देते. कारण स्वामी म्हणाले की, मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. स्वामींनी नेहमीच अर्थपूर्ण, उद्देशपूर्ण आणि आध्यात्मिक जीवन जगण्यास प्रोत्साहन दिले आहे. तसेच शिस्त, समर्पण, भक्ती, दृढनिश्चय आणि विवेक या पाच गोष्टींचे महत्त्व स्वामींनी अधोरेखित केले आहे, असेही ऐश्वर्याने म्हटले.
ऐश्वर्या राय म्हणाली की, फक्त एकच जात आहे, ती म्हणजे मानवता आणि त्याचप्रमाणे फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेमाचा धर्म. फक्त एकच भाषा आहे, ती म्हणजे हृदयाची भाषा आणि फक्त एकच देव आहे, तो सर्वव्यापी आहे. ऐश्वर्याचे हे भाष्य तिथे उपस्थित भक्तांना आणि तिच्या चाहत्यांना आवडले असून ऐश्वर्या राय बच्चनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या समारंभात ऐश्वर्या राय बच्चन तिच्या साध्या पोशाखामुळे देखील चर्चेत राहिली. तसेच कार्यक्रमादरम्यान ती एका ठिकाणी फुले नेताना दिसली.
दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चन ही श्री सत्य साई बाबांची अनुयायी आहे. केवळ ऐश्वर्या रायच नाही तर तिचे आई-वडील आणि कुटुंब देखील श्री सत्य साई बाबांचे भक्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा ऐश्वर्याचा जन्म झाला, तेव्हा तिचे पालक पुट्टपर्ती येथे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. शिवाय, ऐश्वर्या सत्य साई बाबांच्या शाळेत बालविकासाची विद्यार्थिनी होती आणि तिथे तिने धर्मशास्त्राचा अभ्यास केला आहे. मिस वर्ल्डचा मुकुट जिंकल्यानंतर ऐश्वर्या श्री सत्य साई बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुट्टपर्ती येथेही गेली होती.


