नाराज नेत्याचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश !
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बरेच नेते पक्षांतर करत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीत प्रवेश केला आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा दणका दिला असून कल्याण डोंबिवलीतील एका माजी नगरसेवकाला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.
भाजपचे नाराज माजी नगरसेवक सुरेश भोईर शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुरेश भोईर यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
कल्याण टिटवाळा परिसरातील भाजपचे निष्ठावंत माजी नगरसेवक सुरेश भोईर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुरेश भोईर यांनी भाजपचे स्थानिक नेतृत्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देत असल्याने सुरेश भोईर हे नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर ठाकरे गटाची ताकद वाढला आहे.
तिकीट मिळणार नाही या भीतीने त्यांनी पक्षांतर केले – नरेंद्र पवार
सुरेश भोईर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटले की, ‘माजी नगरसेवक सुरेश भोईर यांचा प्रभाग मध्ये आरक्षण पडलेला आहे. ते त्यांच्या मुलासाठी तिकीट मागत होते. त्यांना तिकीट मिळणार नाही याबाबत शंका होती. या भीतीने उद्धव ठाकरे पक्षात ते गेले. ज्यांना संभ्रम आहे ते आमच्याशी थेट बोलतात आणि आमच्याशी बोलणं झाल्यावर त्यांना खात्री पटल्याने ते दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारही करत नाही.
गैरसमज दूर झाला असता तर ते गेले नसते – पवार
पुढे बोलताना नरेंद्र पवार म्हणाले की, ‘सुरेश भोईर यांनी चर्चा केली असती तर त्यांना देखील आम्ही क्लियर केलं असतं. आरक्षणामुळे त्या ठिकाणी अडचण असून ज्येष्ठ आणि माजी नगरसेवक असल्याने त्यांचं चांगलं काम आहे, मात्र त्यांनी नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. त्यांनी राजीनामा दिला तेव्हा जिल्हाध्यक्ष निवडणूक प्रमुख, प्रदेशाध्यक्ष यांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांचा जो गैरसमज होता तो दूर झाला असता तर ते गेले नसते.


