कारवाई तर नक्की होणार…
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील वाद पुढे येताना दिसतोय. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले होते. त्यानंतर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांनी रविंद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचे सांगितले गेले.
सध्या पक्षात होणाऱ्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटात वाद निर्माण झालाय. हा वाद थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला.
त्यामध्येच आता ठाण्यात शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना मोठा वाद झाला. भाजपा आणि शिवसेना गटात थेट राडा त्यावरून झाला. भाजपाच्या माजी नगरसेवकांनी थेट शिंदेंच्या शाखाप्रमुखांच्या कानशिलात लगावली. यावर भाजपचे निवडणूक प्रभारी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. याशिवाय मुंबई महापालिकेमध्ये १०० जागा लढवण्यावरही त्यांची माहिती दिली.
मुंबई महापालिकेची निवडणूक अजून जाहीर झालेली नसली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे दोन महिन्यांत कधीही निवडणूक होऊ शकते. या पार्श्वभूमिवर भाजप निवडणुकीसाठी संपूर्ण तयारीनिशी सामोरे जात आहे. त्यांनी पक्षाच्या प्रथेप्रमाणे केलेल्या सर्व्हेक्षणात भाजप ‘अब की बार १०० पार’ करण्याचे अंदाज आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने किती जागांवर लढायचे याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागा असून भाजप सर्वाधिक म्हणजे १०० हून अधिक जागा जिंकेल, असा त्यांच्या सर्व्हेक्षणाचा अंदाज आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, आम्ही भाजपा महायुती मिळून यावेळी मुंबईचा नक्कीच महापौर बनवणार आहोत. मुंबईची जनता सुद्धा विकासाच्या बाजूने आहे. विकास म्हणजे भाजप आहे असेही ते म्हणाले. तर भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावर बावनकुळे म्हणाले की या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. भाजपकडून कोणतीही धमकी दिली गेली नाही. हे आमचे संस्कार आणि संस्कृती नाही असेही बावनकुळे म्हणाले.


