उद्धव ठाकरेंच्या उपस्थित वऱ्हाडी मंडळींकडून विवाहस्थळी घोषणाबाजी !
सध्या सर्वत्र लग्नसराईचा काळ सुरु असून अनेक नेते मंडळींच्या घरातील लग्न सोहळा थाटामाटात पार पडत आहेत. अशातच या लग्न सोहळ्याला वरिष्ठ नेत्यांना आमंत्रितही केले जात आहे. यादरम्यान ठाणे शहरात झालेल्या काही विवाह सोहळ्याला महत्वाच्या राजकीय मंडळींनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरात आठवड्याभरात दोन वेळा लग्न सोहळ्याला उपस्थित लावली. शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरे यांची कन्या दक्षता तरे आणि माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांचा मुलगा विशाल या भावा बहिणीयाच्या विवाह सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील, माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. परंतू, उद्धव ठाकरे या विवाह सोहळ्यास येताच वऱ्हाडी मंडळींकडून ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कोणाच्या बापाची’ अशी घोषणाबाजी सुरु झाली. या घोषणांकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या घोषणा सुरू असतानाच माजी महापौर मीनाक्षी शिंदे तसेच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाचे काही माजी नगरसेवक हे देखील विवाह सोहळ्यास आले. त्यावेळी वऱ्हाडी मंडळींकडून आणखी जोरजोरात घोषणा दिल्या जात होत्या.
