दैनिक चालू वार्ता -शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
( शिरूर ) पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, तथाकथित अमली पदार्थ वापराच्या चर्चेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. राजकीय वक्तव्यांमधून झालेल्या आरोपांमुळे तालुक्याची प्रतिमा डागाळत असल्याची तीव्र भावना सुशिक्षित व निर्व्यसनी तरुणांकडून व्यक्त होत आहे.
रांजणगाव जिल्हा परिषद गटात झालेल्या निवडणुकीनंतर काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी युवकांचा गैरवापर झाल्याचे गंभीर आरोप केले. त्यावर प्रत्युत्तर देताना इतर पक्षांच्या नेत्यांनीही “ठोस पुरावे असल्यास सर्वपक्षीय पातळीवर कारवाईसाठी पुढाकार घेऊ” अशी भूमिका मांडली. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सामान्य, कष्टकरी आणि करिअर घडविण्यासाठी झटणारा युवक वर्ग विनाकारण बदनाम होत असल्याची खंत समाजमाध्यमांवर व नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
“आम्हाला शिक्षण, नोकरी आणि भविष्य घडवायचे आहे. चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; पण संपूर्ण तालुक्याच्या तरुणांवर संशयाची छाया टाकू नये,” अशी ठाम प्रतिक्रिया अनेक युवकांनी नोंदवली.
दरम्यान, इतक्या गंभीर स्वरूपाच्या चर्चांनंतरही अधिकृत स्तरावर कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय व्यासपीठांवर आरोप होत असताना प्रशासनाने तातडीने वस्तुस्थिती स्पष्ट करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रांजणगाव औद्योगिक परिसर झपाट्याने विकसित होत असताना बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ येथे येत आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित होत आहे. कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास त्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका सामाजिक संघटनांनीही घेतली आहे.
————————————————–
चौकट—
नागरिकांची ठाम मागणी
आरोपांची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी
चुकीचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी
निष्पाप तरुणांना बदनामीपासून वाचवावे
प्रशासनाने वस्तुस्थिती जाहीर करून संभ्रम दूर करावा
तालुक्याची ओळख उद्योग, शेती व संस्कारांनी आहे. मुठभर व्यक्तींच्या कथित कृत्यांमुळे संपूर्ण समाजावर संशयाची छाया पडू नये, हीच सर्वसामान्यांची भावना आहे. प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन सत्य परिस्थिती स्पष्ट करावी आणि शिरूर तालुक्याची प्रतिमा अबाधित ठेवावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.
