बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प !
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्याआधी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विरोधकांना सुनावत सुनेत्रा पवार यांचा विजय अजित पवार यांना श्रद्धांजली असेल असं आवाहन केलं.
मेळाव्याला संबोधित करताना सुनील तटकरे भावूक झाले होते. “माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वाधिक काळ मी अजितदादांसोबत घालवला आहे. सर्वच पक्षांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन केलं आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्या मनात नसेल तरी आपण प्रयत्न करुया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजित दादांना भावपूर्ण शद्धांजली अर्पण करणे म्हणजे सुनेत्रा पवार यांना विधानसभेवर निवडून देणे या भावनेतून सगळ्या राजकीय पक्षांनी विनंती आहे. निवडणूक लादली गेली तर बारामतीकरांना विनंती आहे की, देशाच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मतांनी सुनेत्रा वहिनी निवडून आल्या पाहिजेत,” असे सुनील तटकरे यांनी म्हटलं.
“ही निवडणूक बिनविरोध व्हावी. जर निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर शप्पथ सांगतो की, बाबासाहेबांनी लोकशाहीची व्यवस्था या देशाला दिली आहे. आजपर्यंत देशात कुठल्याही विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी जो कोणी उमेदवार विजयी झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणायचं असा संकल्प करुया आणि हीच अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल, असेही सुनील तटकरे म्हणाले.
तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना व्यासपीठावरून एक विशेष विनंती केली. ” सुनेत्रा वहिनी, तुम्ही आज फक्त उमेदवारी अर्ज भरा आणि थेट प्रचाराच्या शेवटच्या सभेलाच या, असे सुनील तटकरेंनी म्हटलं. अजित पवार ज्या पद्धतीने शेवटच्या सभेला येऊन बारामतीकरांशी संवाद साधायचे, तीच परंपरा कायम ठेवण्याची विनंती तटकरेंनी केली.
बिनविरोधचे प्रयत्न फोल
बारामतीची परंपरा राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, काँग्रेसने दिल्लीतून अॅड. आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने आता बारामतीत राजकीय सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत या जागेसाठी १९ हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात बारामतीकर अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा पवारांनाही पाठिंबा देतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
