वसमत प्रतिनिधी -बालाजी अडकिने
वसमत तालुक्यातील मौजे सारोळा येथे आज (ता. ११) एक अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन पार पडले. गावातील तरुणांनी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ‘जावळ काढणे आंदोलन’ करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सारोळा येथील प्रशांत लोखंडे (थोरावेकर) यांनी स्वतःच्या जावळ काढण्याचा कार्यक्रम आयोजित करून आंदोलनाला सुरुवात केली. वसमत-गणेशपुर-थोरावा-कागबन-सारोळा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदने आणि आंदोलने करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
याच निषेधार्थ हे आंदोलन उभे करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मा . श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. आंदोलनाच्या निमंत्रण पत्रिका मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने या आंदोलनाची चर्चा सर्वत्र रंगली.
आंदोलनाच्या वेळी गावातील तरुण मोठ्या संख्येने एकवटले होते. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशासनाला निवेदन आणि पत्रिका देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
या आंदोलनावेळी माधव कदम, देवा दुधाटे, विशांबर ढवळे, विश्वनाथ कदम, माऊली फुलारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
