वसमत प्रतिनिधी -बालाजी अडकिने
ज्ञान, जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर आयुष्य घडवता येते, हा प्रेरणादायी संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम वसमत शहरात पुन्हा एकदा रंगणार आहे. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तब्बल १८ तास अखंड अभ्यास करून त्यांना अनोखी आदरांजली वाहण्याचा उपक्रम १३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
वसमत येथील विठाई सार्वजनिक वाचनालय, लिटल किंग्स इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, यंदा या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
१३ एप्रिल सकाळी ६ ते १४ एप्रिल रात्री १ वाजेपर्यंत चालणाऱ्या या अभ्यास मॅरेथॉनमध्ये इयत्ता आठवीपासून पदवी, पदव्युत्तर तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सहभाग पूर्णपणे मोफत व खुला ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात येणार असून, १८ तासांचा अभ्यास पूर्ण करणाऱ्यांना तत्काळ प्रेरणादायी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
“वाचन, अभ्यास आणि ज्ञानाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करता येते,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. डिजिटल युगात मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांकडे वळण्याचा संदेश देणारा हा उपक्रम वसमत शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊन स्पर्धा परीक्षांसाठी नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आयोजक व ज्येष्ठ पत्रकार
– प्रा. डॉ. नामदेव दळवी
संस्थापक, विठाई सार्वजनिक वाचनालय
