नाशिक : नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली असून कंपनीची एचआर अधिकारी निदा खान ही अद्याप फरार आहे.
तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके काम करत आहेत. या प्रकरणामुळे संबंधित कंपनीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर कंपनीने तातडीने आपले कामकाज थांबवले आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याचे आदेश देण्यात आले असून सुमारे 150 कर्मचाऱ्यांना सोमवारपासून वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीत झाडाझडती घेतली असून दिल्लीहून आलेल्या पथकानेही तपास केला आहे. कंपनीत सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर आरोपांचीही चौकशी केली जात आहे. कंपनीने अंतर्गत तपासणी सुरू केली असून काही कर्मचाऱ्यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर कामगार उपायुक्त कार्यालयाकडूनही कंपनीत तपासणी करण्यात आली. मात्र, तपासासाठी गेलेल्या पथकाला कंपनीत एकही कर्मचारी आढळला नाही. त्यांनी शॉप अॅक्टसह इतर कागदपत्रांची तपासणी केली.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिल रोजी नाशिकमध्ये येऊन या प्रकरणाची पाहणी करणार आहे. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे कंपनीचे नाशिकमधील युनिट सध्या चौकशीच्या भोवऱ्यात सापडले असून कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. तसेच नवीन भरती प्रक्रियाही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
