दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : खडकवासला परिसरातील जांभळी गावात असलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून खोदकाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उषा चव्हाण यांचे पुत्र हृदयनाथ दत्तात्रय कडू (वय ५२, रा. पद्मादर्शन सोसायटी, पद्मावती, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. उषा चव्हाण-कडू यांनी जांभळी गावातील जमीन १९९९ मध्ये खरेदी केली होती. १५ मे रोजी जेसीबीने जागेत खोदकाम सुरू असल्याची माहिती कडू यांना मिळाली. त्यानंतर कडू पोलिसांना घेऊन तेथे गेले. तेव्हा त्यांच्या जागेत ४०० फूट लांब, ४ फूट रुंद आणि २ फूट खोल असे चर खोदल्याचे दिसून आले.
त्यांच्या जागेत वहिवाटीसाठीचा रस्ता बंद करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच तारेचे कुंपण तोडल्याचे आढळून आले. त्यानंतर कडू यांनी चौकशी केली असता राजेंद्र धनकुडे यांनी अतिक्रमण केल्याची माहिती कडू यांना मिळाली. कामासाठी आमची कोणतीही परवानगी घेतली नाही असे ते म्हणाले.
