
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे पुढचा राष्ट्रपती कोण होणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. वेगवेगळी समीकरणेही मांडली जात आहेत. भाजपा तर 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रपदीपदासाठी आदिवासी उमेदवार देण्याचा विचार करत आहे.
भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाली. त्यात आगामी निवडणुकीचे गणित मांडताना राष्ट्रपतीपदी आदिवासी उमेदवार द्यावा असा मुद्दा मांडला गेला. लोकसभेच्या 543 जागांपैकी 47 जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. 62 लोकसभा मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गुजरातमध्ये तर आदिवासींची मते ही निर्णायक ठरतात. यावर्षी गुजरातमध्ये तर पुढच्या वर्षी छत्तीसगढमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपदीपदी आदिवासी उमेदवार दिल्यास त्याचा फायदा या निवडणुकामध्ये निश्चितच होऊ शकतो.