
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या बॅरकपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.
तीन वर्षांनंतर अर्जुन सिंह यांनी घरवापसी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. गेल्या ११ महिन्यांत भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये येणारे अर्जुन सिंह हे पाचवे मोठे नेते आहेत. दुसरीकडे, भाजपच्या आमदारांची संख्या पश्चिम बंगालमध्ये एका वर्षाच्या आत ७७ वरून कमी होऊन ती ७० वर आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून सलग तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांची नजर आता दिल्लीच्या खुर्चीवर असल्याचे बोलले जाते. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती सुधारण्यावर अधिक भर देत आहेत. २०२४ मध्ये निवडणुकीत संपूर्ण ताकदीसह आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. ममता बॅनर्जीं या ‘मिशन’ अंतर्गत ‘राजकीय वजन’ असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी करून घेत आहेत, हे काही दिवसांच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे.