
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
वसमत:-या भूतलावर शिवतत्वाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जगद्गुरु पंचाचार्यांच्या माध्यमातून जगद्गुरु दारुकाचार्यांच्या माध्यमातून नंदी गोत्रीय शाखेच्या थोरला मठ संस्थांनाच्या माध्यमातून धर्मप्रचाराचे कार्य करण्याची आचार्य परंपरा आजतागायत सुरू आहे. अशाच आचार्य परंपरेतील सिद्धहस्त पुरुष लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य माऊली यांचा पुण्यतिथी सोहळा दिनांक 10 व 11 जून 2022 रोजी मोठ्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनाने संपन्न झाला. लिंगैक्य दिगंबर शिवाचार्य महाराज हे थोर युगपुरुष होते, त्याचप्रमाणे चमत्कारी होते, तंत्रज्ञानी तथा वैरागी पुरुष होते. इष्टलिंग पूजेचे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य दिगंबर शिवाचार्य यांचे जीवन. त्यांनी त्यांच्या जीवन काळात वीरशैव धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून मोठ्या प्रमाणात समाजबांधवांमध्ये धर्म पताका जागृत केली. आजच्या या कार्यक्रमाचे विशाल वटवृक्षरुपाचे बीज आचार्य दिगंबर शिवाचार्य यांनी केलेल्या धर्मकार्याचेच आहे, याबाबत कुठलाही संकोच भाव नाही आणि म्हणूनच अशा या थोर पावन पुण्यात्मा लिंगैक्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांचा वारसा आणि विचार जपण्याचे कार्य अशा प्रकारच्या कार्यक्रमातून करण्यात येत आहे. म्हणूनच या वर्षाच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात काल दिनांक १० जून २०२२ रोजी प्रात:काळी लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या समाधीला १०८ माहेश्वरमूर्तींच्या पवित्र अशा वेदमंत्रांच्या घोषांत समाधीचा महाअभिषेक करण्यात आला, तदनंतर या १०८ माहेश्वर मूर्तींची जंगम अर्चना करण्यात आली. यामुळे मठातील वातावरण एकदम प्रफुल्लित आणि पवित्र असे झाले होते अशाच या पवित्र पावन वातावरणाच्या प्रभावात आज सकाळी लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज माऊलींच्या समाधी अभिषेकानंतर श्री ष. ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज* यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री ष. ब्र. १०८ करबसव शिवाचार्य महाराज, लासीन मठ वसमत, श्री ष.ब्र. १०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज, गिरगावकर, श्री ष.ब्र. १०८ काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर, श्री ष.ब्र. १०८ सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा, श्री ष. ब्र. १०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, हदगावयांच्या प्रमुख उपस्थितीत थोरला मठ संस्थान ते महात्मा बसवेश्वर मंगल कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. अशा पवित्र व पावन गुरुवर्यांच्या उपस्थितीमध्ये व हजारो शिवभक्तांच्या गुरुराज माऊलीच्या नामघोषात ही शोभायात्रा थोरला मठ संस्थानापासून निघून ११ वाजता बसवेश्वर मंगल कार्यालयात पोहोचली.
मंगल कार्यालयात शोभायात्रा पोचल्यानंतर उपलब्ध धर्मपीठावर थोरला मठ संस्थानचे मठाधिपती श्री ष. ब्र. १०८ सांब शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व श्री ष. ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसभेला सुरुवात झाली. या धर्मसभेत विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती. प्रामुख्याने नुकतेच ज्यांना सकाळ समूहाच्या वतीने ग्लोबल अवार्ड दुबईमध्ये प्रदान करण्यात आला असे श्री रामदास पाटील सुमठाणकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. त्यासोबतच वसमत विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आ. श्री चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरेयांचीही उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आ. जयप्रकाश मुंदडा साहेब यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री सुनीलभाऊ काळे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजूदादा चापके, भाजपा तालुकाप्रमुख श्री खोबराजी नरवाडे, हिंगोली शहराचे माजी नगराध्यक्ष श्री सुधीरआप्पा सराफ, व वसमत शहरातील विविध समाज घटक वाणी समाज, तेली समाज, जंगम समाज, कानोडी समाज, गवळी समाजअशा या सर्व समाजांचे प्रतिनिधि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना विविध राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींनी राजसत्ता ही धर्म सत्तेची सेवा करण्यासाठी असल्याचे मत प्रदर्शित करून धर्मसत्ता ही नेहमीच पूज्यस्थानी असल्याचे सांगून धर्म सत्तेची सेवा करण्याची संधी सतत प्राप्त होओ अशी अपेक्षा व्यक्त केली. सदरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातीलसर्व भक्त मंडळी विशाल संख्येने उपस्थित होते.
वीरशैव लिंगायत समाजातील नुकताच बारावी परीक्षेत लागलेल्या निकालाच्या माध्यमातून ८० टक्के आणि त्यावरील गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान थोरला मठ संस्थान वसमत तथा सर्व शिवाचार्य यांच्यावतीने करण्यात आला व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून थोरला मठ संस्थान तर्फे नांदेड येथील जीवन आधार ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने भव्य दिव्य प्रमाणात रक्तदान शिबिराचेआयोजन करण्यात आले. यात अनेक भक्तांनी रक्तदान केले व आपला वीरशैव लिंगायत समाज सामाजिक जाणिवेतून योग्य प्रकारे आचरण करतो हेही दिसुन झाले.
वेतन न घेता वतनासाठी काम करणारे राष्ट्रधर्म तज्ञ होऊ शकतात आणि म्हणून कलीयुगा मध्ये “संघे शक्ति कलियुगे” हा मंत्र धारणा शक्तीने धारण करून जोपासला तर राष्ट्र आणि धर्म आत्मउन्नतीचा श्रेष्ठ मार्ग दाखविल्याशिवाय राहणार नाही.असे प्रतिपादन धर्मपीठावर उपस्थित आचार्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या महाप्रसादासाठी सहयोग केलेल्या सर्व भाविक भक्तांचे आभार तथा गुरुवर्यांचे अनंत अनंत मंगल आशिर्वाद. महाप्रसाद वितरणासाठी मारतळा येथील श्री परमेश्वर घागरदरे यांच्या मिलिटरी अकॅडमी चे स्वयंसेवक तथा वीरशैव लिंगायत समाज बांधव यांनी सहकार्य करून भोजन व्यवस्था उत्तम रीतीने सांभाळली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नंदी गोत्राचे सूत्र वृष्टीआहे. त्या अनुषंगाने लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांचा ८० वा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाल्या झाल्या लगेचच वृष्टी सूत्राने सुद्धा म्हणजेच पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये “”जय जवान जय किसान”“या मंत्राची प्रचिती दिली.
अशाप्रकारे एक उत्तम धर्मजागृतीचा कार्यक्रम सर्व समाज बांधवांनी मिळून यशस्वी करून पुण्य पदरात पाडून घेतल्याचे मत विद्यमान मठाधिपती श्री ष.ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ संस्थान वसमतयांनी व्यक्त केले व अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे उत्तरोत्तर आयोजन बंदिस्त सभागृहात न करता यापुढे विशाल अशा पटांगणावर करण्याचे सूतोवाच करून कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाल्या बाबत आनंद व्यक्त केला व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाल्याचे घोषित करण्यात आले.