
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद – माजी मंत्री पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत , त्या नाराज नाहीत . त्यांच्यासाठी विधान परिषद म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न किंवा मोठी गोष्ट नाही , अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली .
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे एका कार्यक्रमासाठी जाताना शनिवारी त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले . यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे . याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलनेही केले .
या अनुषंगाने दरेकर म्हणाले की , पंकजा मुंडे नाराज नाहीत , त्या राष्ट्रीय नेत्या आहेत . त्या राज्याच्या प्रभारी आहेत . त्यांना आमच्या पक्षात भविष्य उत्तुंग आहे . त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकाभिमुख आहे . काही लोक हा विषय तापवण्याचा प्रयत्न करत असून ते आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत . मात्र यामुळे पंकजा मुंडे नाराज असण्याचे कारण नाही .
औरंगाबादच्या मध्यवर्ती भाजप कार्यालयावर हल्ला करणारे कोण होते , हे माहीत नाही . या मागे कोण होते हे माहीत नसल्याचेही दरेकरांनी सागितले . फडणवीस यांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे राज्यसभेतील सहाव्या जागेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मायक्रो प्लॅनिंग यशस्वी ठरले . जनतेने पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला .
फडणवीस यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कौतुक केले आहे . पोपटपंची संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली आहे . या निवडणुकीत संजय राऊत यांच्यापेक्षा धनंजय महाडिक यांना जास्त मते मिळाली . आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकीत अशीच रणनीती वापरणार आहोत .
शिवसेना स्वाभिमानी असती तर त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्याकडे मतांसाठी लाचारी पत्करली नसती असा आरोपही दरेकरांनी केला . दरम्यान माजी मंत्री संजय राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्याचा केविलवाणी प्रकार करीत असल्याचा आरोपही दरेकरांनी केला आहे .