
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे.
बुलढाणाः दि.१३. राज्यभरासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यातच रविवारी दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने लोणार तालुक्यातील सुरू असलेल्या पुलाच काम वाहून गेले आहे.त्यामुळे चार गावाचा संपर्क तुटला आहे. यासोबतच या मार्गावरील वळण रस्ताही वाहून गेल्याने कोनाटी, झोटिंगा, देऊळगाव कोळ, महार चिकना या गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. काल दुपारी बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात काही ठिकाणी दाणादाण उडाली. वळण रस्ता वाहून गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहने जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी रस्ता करावा हीच ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. तर मलकापूर तालुक्यात झालेल्या पावसाने देवधाबा गावातील काही घरात पाणी शिरल्याने पहिल्याच पावसात नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
देवधाबा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; पहिल्याच पावसात नागरिकांची तारांबळ
काल सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील देवधाबा परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाल्याना पूर आला होता. यावेळी अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह व विजांच्या गडगाडाटात आलेल्या पावसाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह गुरांचीही फजिती झाली. या पावसाने शेतकरी मात्र सुखावला असून आगामी काळात पेरणीपूर्व कामांना गती मिळणार आहे.