
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शेटफळ हवेली- फुलांनी, चित्रांनी, फुग्यांनी सजवलेल्या शाळा, युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या आकाराची, रंगाची दप्तरे घेतलेली आई-बाबांचा हात घट्ट धरून रडत असलेली, काही हिरमुसलेल्या चेहऱ्याने गप्प उभी असलेली मुले, काही कुतूहलाने बघत असलेली, हसत,खेळत असलेली मुले, रडणाऱ्या मुलांना समजावत असलेले शिक्षक, सचिंत चेहऱ्याने उभे असलेले पालक.. हे दृश्य आज शेटफळ हवेली येथील महादेव रावजी शिंदे वस्तीशाळा या शाळेमध्ये दिसून आले.
राज्यातल्या अनेक शाळा बुधवार, १५ जून रोजी सुरू झाल्या. अनेक छोट्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा आज श्रीगणेशा झाला. शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुलांना शाळेची गोडी लागावी, भीती वाटू नये यासाठी पहिल्या दिवशी त्यांना आवडतील अशा गोष्टी वर्गांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. फुगे, खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होते. वर्गखोल्याही आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या.
शेटफळ हवेली येथील सर्व शाळांमध्ये मुलांचे स्वागत करण्यासाठी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. सरस्वतीच्या मूर्तीस नमस्कार करून मुलांनी शाळेतल्या आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली.
‘शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांची आणि मुलांची ओळख होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत एवढाच कार्यक्रम असतो. या वर्षी आम्ही छोट्या मुलांचा वर्ग जंगल या संकल्पनेनुसार सजवला असून, वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे काढली आहेत. पहिल्यांदाच शाळेत पाऊल टाकणाऱ्या मुलांना शाळा आवडावी यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न करतो,’ असे शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुलकर्णी सर व उपशिक्षक श्री.सुभाष चव्हाण सर यांनी सांगितले.