
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
मंत्रिमंडळात औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यावर MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. यावर आता, इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? असे किती जरी आडवे आले, तरी त्यांना आडवे करण्याची ताकदही आम्ही ठेवणार. औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर होणार म्हणजे होणारच, असे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
इम्तियाज जलील काय शहराचा बादशाह आहे का?
मंत्री मंडळात औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार हा ठराव पास झाल्यावर इम्तियाज जलील म्हणाले, की कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर होऊ देणार नाही. या विषयी त्यांनी काल बैठकसुध्दा घेतली होती. या बद्दल विचारले असता शिरसाट म्हणाले, कोण इम्तियाज जलील? इम्तियाज जलील काय या शहराचा बादशाह आहे का? इथली जनता महत्वाची आहे आणि हा शिवसेना प्रमुखांचा शब्द आहे. संजय राऊतांसारखे खोटे नाही. संजय राऊत मागे म्हणाले होते, की प्रस्ताव गेला आहे. मग आता प्रस्ताव घ्यायची गरज काय पडली? असा सवालसुद्धा शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.
▪️ नामांतराची अंमलबजावणी महिनाभरातच दिसून येईल..
शिरसाट पुढे म्हणाले की, औरंगाबादचे संभाजीनगर करणे, हा उद्धव साहेबांनी घेतलेला निर्णय आहे. संभाजीनगर हे होणारच आणि तातडीने होणार. यासाठी केंद्राकडून मान्यता आणावी लागते. केवळ प्रस्ताव घेऊन नसतं होत. याला तातडीने मान्यता आणणार आणि असे किती जरी आडवे आले ना, तरी त्यांना आडवे करण्याची ताकद सुध्दा आम्ही ठेवणार. आणि औरंगाबादचे संभाजीनगर हे होणार म्हणजे होणारच, यामध्ये कोणताही दुमत नाही आणि आता ही घोषणा राहणार नाही. याची अंमलबजावणी तुम्हाला महिनाभरातच दिसून येईल.