
दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी- सुशिल वडोदे
सिल्लोड :जळकी (वसई) येथे शेतातील पिकाची कोळपणी सुरू असताना प्रवाह उतरलेल्या विद्युत खांबाचा धक्का लागून एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर पायात बूट असल्याने शेतकरी बालंबाल बचावला आहे. यामध्ये सदरील शेतकऱ्याचे सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहे.सध्या खरिपाच्या पिकांची कोळपणी तसेच आंतरमशागतीची कामे जोरात सुरू आहेत. जळकी (वसई) येथील शेतकरी साहेबराव शेळके हे आपल्या शेतातील गट नंबर १२१ मध्ये कपाशी पिकांची कोळपणी करीत होते. त्यांच्या शेतातून विद्युत लाईन गेलेली असून त्याचा खांब रोवलेला आहे. या खांबाला ताण देण्यासाठी तार बांधलेली असून पावसाळा असल्याने त्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला होता. कोळपणी करताना एका बैलाचा या तारेला स्पर्श होताच त्याचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. दुसरा बैल दूर असल्याने वाचला तर, साहेबराव शेळके यांना जोराचा झटका बसला, मात्र पायात बुट असल्याने ते बालंबाल बचावले. या घटनेचा अजिंठा महावितरण कंपनीचे सहायक अभियंता दिलीप साखळे. कर्मचारी रमेश पांढरे, सुरेश आगे आदींनी पंचनामा केला.