दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
तालुक्यातील वडफळी मंडळात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे वडफळी येथील देव नदीने रौद्र रुप धारण केल्याने नदी काठावरील शेतीचे मोठे नुकसान होऊन नदीचे पाणी वडफळी येथील शासकीय आश्रम शाळेत घुसले त्यामुळे आश्रम शाळेत मोठे नुकसान झाले आहे,अचानक आलेल्या पाण्याने सर्वजण हवालदिल झालेत.दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही
गेल्या दोन दिवसा पासुन अक्कलकुवा तालुक्याच्या अतिदुर्गम भागात जोरदार पाऊस सुरु आहे.आज सकाळी 7 वाजेच्या सुमारानंतर वडफळी,चापडी,कुकडीपादर, पांढरामाती,मोवान परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली त्या नंतर पावसाने अधिक जोर पकडला त्यामुळे सकाळी 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास अचानकपणे देव नदीला मोठा पुर आला.पुराच्या पाण्याचा वेग एवढा जोरदार होता की पुराचे पाणी नदी काठच्या आश्रम शाळेत घुसले त्यामुळे आश्रम शाळाच्या परिसराला टापुचे स्वरुप प्राप्त झाले.आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची राहण्याची व वर्ग खोल्यांच्या इमारतीत कमरे एवढे पाणी भरले.आश्रमशाळेत पुराचे पाणी येताच काही विद्यार्थी सुरक्षित स्थळी हलले तर काही विद्यार्थ्यांना बाहेरुन दोर बांधून त्याच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.मात्र आश्रमशाळेतील इतर साहित्याचे नुकसान झाले तर काही साहित्य वाहुन गेले.पुराच्या पाण्याचा निचरा झाल्या नंतर आश्रम शाळेच्या आवारात सर्वत्र मातीचा गाळ साचून राहिला.सुदैवाने सदर घटना दिवसा घडली त्यामुळे वेळीच मदत मिळून मोठी अनुचित घटना होण्यापासुन वाचली.
सकाळी 7 वाजे नंतर जोरदार पाऊस बरसल्याने अचानक पणे पुराचे पाणी वाढले यात वडफळी गावातील संपत गिना तडवी,सीताराम गिना तडवी, श्रावण गिना तडवी, गोपाळ शंकर तडवी, गोण्या गोपाळ तडवी यांच्या घरात पाणी shirun घरातील जीवनावश्यक साहित्य,तसेच संसारोपयोगी वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर काहींच्या वस्तु वाहुन गेल्याचे सांगण्यात आले.
पुराच्या पाण्याच्या परिघात आलेले वडफळी,चापडी,कुकडीपादर, पांढरामाती,मोवान या परिसरातील काही ग्रामस्थांची शेती तर काहींचे उभे पीक वाहुन गेलेत त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरात कितीही मोठा पाऊस पडला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर देव नदीला पुर येत नाही त्यामुळे परिसरात ढगफुटी सारखा प्रकार घडला असावा अशी शंका काही नागरिकांनी व्यक्त केली.
