
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI)यांच्यात आज इरीच्या दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्राच्या (ISARC) दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमांचा प्रारंभ करण्याबद्दल करार झाला. अन्न आणि पोषक आहार सुरक्षेसाठी, दोघांमध्ये असलेली भागीदारी वृद्धींगत करण्यासाठी हा करार करण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत, कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा आणि इरीचे महासंचालक डॉ बाली यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
पाच वर्षांपूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्यानंतर, आयएसएआरसी या संस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेमध्येच तांदळाचे मूल्यवर्धन करण्यासाठीचे उत्कृष्टता केंद्र- CERVA ही स्थापन करण्यात आले आहे. यात, एक अत्याधुनिक आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेली प्रयोगशाळा असून त्यात, धान्य आणि तुसे यातील धातूचा दर्जा तसेच गुणवत्ता तपासण्याची क्षमता आहे. CERVA ची एक अत्यंत महत्वाची कामगिरी म्हणजे, एक अत्यंत कमी आणि एक मध्यम स्वरूपाचा ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या तांदळाची – इरी 147 (GI 55) आणि इरी 162 (GI 57), ही दोन वाणे विकसित करणे. इरीचे मुख्यालय आणि सीईआरव्हीए च्या चमूने संयुक्तपणे ही कामगिरी यशस्वी केली. तांदळाच्या बहुतांश वाणामध्ये जीआयचे प्रमाण अतिशय जास्त असते आणि अनेक भारतीयांच्या आहारात, तांदळाचा समावेश असतोच. त्यामुळे जीआय कमी असलेल्या तांदळाच्या वाणामुळे भारतीयांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण कमी होऊ शकेल.
ISARC च्या दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, अन्न आणि पोषण सुरक्षा सुधारणे, आरोग्य तसेच छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, उत्पादकतेत वाढ, कमी उत्पन्न भरुन काढणे, हवामान बदलाचा सामना करण्याची क्षमता असलेली पिके, यांत्रिकी आणि डिजिटल शेती, बाजारपेठेशी जोडून देणे, आधुनिक मूल्य साखळी, महिला आणि तरुणांसाठी उद्योजकता आणि क्षमता विकास अशा सगळ्या उपक्रमांचा समावेश आहे.
या करारामुळे भारत आणि उर्वरित दक्षिण आशियामधील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी काम करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मत आहुजा यांनी यावेळी व्यक्त केले.
फिलीपिन्सबाहेर आयएसएआरसी हे जगभरातील इरीचे पहिले आणि सर्वात मोठे संशोधन केंद्र आहे, असे डॉ बाली यावेळी म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमात भारत सरकार आणि IRRI यांच्यातील दीर्घकालीन सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल. ISARC द्वारे, धान्याचा दर्जा, पौष्टिक गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा यावरही प्रशिक्षण दिले जाते. कराराच्या या दुसऱ्या टप्प्यात, उत्पादक आणि ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, संपूर्ण भारत आणि दक्षिण आशियात शाश्वत आणि सर्वसमावेशक तांदूळ-आधारित व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने संशोधन आणि विकासाचा विस्तार करण्याचा प्रस्तावही ISARC ने दिला आहे.