
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
हवामान विभागाकडून पालघरला रेड अलर्ट
वावर-वांगणी लेंडी नदीवरील पूल पाण्याखाली
जव्हार:-तालुक्यातील गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वावर-वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल तीन दिवसापासून पाण्याखाली गेल्याने,त्या बाजूकडील नागरिकांचा संपर्क तुटला असून परिसरातील नागरिकांना चालतवड मार्गे ४२ की.मी.चा वळसा घालून तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत आहे.तसेच दादरकोपरा ते वावर-वांगणी याही मार्गावर दरड कोसळल्याने तोही मार्ग वाहतूक बंद झाला होता.
गेल्या आठवडाभरात धुवांधार पावसाने जोर धरला असून जवळपास ७२ तासापासून पावसाच्या संततधार पाऊस सुरू आहे.तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली तर काही गावांतील रस्त्यावर मोरी,साकाव बुडाल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.वावर-वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल बुडाल्याने वाहतूक आणि ये-जा करणे बंद झालं आहे.तसेच सर्वत्र पाणीच पाणी असून,नदी,ओहळ,नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
तालुक्यातील दादरकोपरा आणि रुईघर-बोपदरी रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.या मार्गावरील नागरिकांना सुद्धा वळसा घालून जव्हार किंवा अन्य ठिकाणी जावे लागत आहे.तसेच झाप रोड,दाभेरी,बोपदरी काही ठिकणी दरड कोसळली तर काही ठिकाणी ग्रामीण भागात मोऱ्या,पूल बुडल्याने अनेक नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
धानोशी ते साकुर गावाजळील मुख्य रस्त्यावरील मोरी पाण्याखाली गेल्याने,दिवसभर तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी संपर्क तुटला होता.यामध्ये साकुर,राममखिंड,कडाचीमेट, पाथर्डी,डोंगरपाडा,वांगानपाडा,जंगलपाडा,मेढा व सोळेचापाडा अश्या आठ ते दहा गावांचा संपर्क तुटला होता.जव्हारला येणारे गावकरी,रुग्ण यांचे मोठे हाल सहन करावे लागले.