दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर-
:मागील आठ दहा दिवसापासून देगलूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीने खरीप पीकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, मूग, उडीद, तूर ही पिके अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. करडखेड, मरखेल, हाणेगाव परिसरात दुबार पेरणी केल्यानंतरही पिके पूर्णतः धोक्यात आली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पंचनाम्याचे सोपस्कर बाजूला ठेवून सन 2019 ला सांगली-कोल्हापूरच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या धर्तीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी सोम्या शर्मा यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना दिले.
पिकांच्या नुकसानीसोबतच नदी नाल्याच्या बाजूच्या जमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या त्यांना वेगळी निधी जाहीर करावी, NDRF व SDRF चे निकष बदलून वाढीव मदत द्यावी, दहा पंधरा दिवसांपासून काम बंद असल्यामुळे कष्टकरी व शेतमजूरांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी या मागण्या निवेदनात करण्यात आल्या. 15 जुलै उजाडल्यामुळे आता खरीप पिकांची परत पेरणी करणेही शक्य होणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देणारे खरीप हंगामच धोक्यात आले आहे. म्हणून केंद्र व राज्य सरकारनी भरीव मदत करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा कैलास येसगे यांनी दिला.
यावेळी कैलास येसगे कावळगावकर, निखील जाधव, विजय पाटील, ज्ञानेश्वर चिंतले, गंगाधर आऊलवार, अशोक वन्नलवार, पांडूरंग भूयारे, शेख अजीज, शंकर मुद्दमवार, नागन्ना येरगलवार, मैन्नोद्दीन वन्नाळीकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
