
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
आरे कारशेडनंतर महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं बदलला आहे. त्यानुसार आता सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
फडणवीस म्हणाले, देशात कोणतंही राज्य घ्या सर्वच राज्यात सरपंचाची थेट जनतेतून निवड होते, त्यामुळं तसेच महाराष्ट्र सरपंच परिषदेत राज्यातील ५० हजारांहून अधिक सरपंचांनी एकमुखानं सरपंचाची निवड थेट जनतेतून व्हावी असं म्हटलं आहे. त्यामुळं अनेक लोकप्रतिनिधींनी आणि देशात जो ट्रेंड आहे त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून कोणीही आलं तरी पैशाच्या जोरावर सरपंच किंवा नगराध्यक्षपदं मिळवली जातात. त्यामुळं जो लायक उमेदवार आहे त्याला बाजूला केलं जातं. यामुळं चांगल्या लोकांची संधी जाते, म्हणून थेट जनतेतून निवडीचा योग्य निर्णय घेण्यात आला असल्याचं यावेळी निमगाव केतकीचे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष गणेश(काका) घाडगे यांनी सांगितलं.