दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणांमध्ये दिवसेंदिवस कमालीचा पाणीसाठा वाढीस लागला आहे. नजिकच्या काळात याच वाढत्या पाणी साठ्याची पातळी पहाता कधीही धोका निर्माण होऊ शकतो. त्याचाच परिपाक म्हणून परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या जायकवाडी धरणात ७३.९७ टक्के एवढा जीवंत पाणीसाठा आहे. सोमवार, दि. १८ जुलै २०२२ रोजी रात्री उशिरा घेण्यात आलेल्या पाणी मोजमापामुळे ही माहिती मिळाली आहे. नजिकच्या काळात असाच वाढता पाणी स्त्रोत राहिल्यास कधीही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी काही प्रमाणात दरवाजे खोलले जाऊ शकतात. अशी माहिती पैठण येथील नाथसागर उत्तर विभागाचे अभियंता यांनी दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी अन्यथा कधीही धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आवाहन करण्यात आले आहे.
