दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी जिल्ह्यातील मौजे टाकळी येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात कमालीचा आनंद व्यक्त केला जात आहे. जालना ते नांदेड दरम्यानच्या समृध्दी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत अनेक समस्या मागील बर्याच कालावधीपासून प्रलंबित होत्या. परिणामी सदर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आपले शेतकरी-मतदार चिंताग्रस्त असल्याचे ध्यानी घेऊन आ. राहूल पाटील यांनी त्यांना सोबत घेत थेट मुंबईतील एमएस आरडीसी कार्यालय गाठले. तेथे कार्यरत अधिकारी श्री. पुलकुंडवार यांची भेट घेऊन आ. पाटील यांनी सदरील समस्या
त्यांच्या कानी घातल्या.
श्री. पुलकुंडवार यांनी या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. पाटील व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत जी तत्परता दाखवली ती खरोखर उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल. लोकप्रतिनिधी या नात्याने आ. पाटील यांनी केलेली शिफारस व ग्रामीण भागातून आलेले चिंताग्रस्त शेतकरी या बाबी लक्षात घेत श्री. पुलकुंडवार यांनी चालढकल न करता किंवा तारीख पे तारीख असे म्हणता चक्क ३.५ मीटर रस्त्याचे पत्रच सदर शेतकऱ्यांना सोपविले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाच्या छटा दिसून आल्या. एकूणच काय तर आ. राहूल पाटील यांनी सदरची समस्या सोडविण्यासाठी ज्या तळमळीने हे प्रयत्न चालविले होते ते उल्लेखनीय असेच ठरले परिणामी शेतकऱ्यांचाही प्रश्न मार्गी लागला.
