दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : शहरी लोकसंख्या येत्या तीन दशकांत एक कोटी पंधरा लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्या वेळी पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण या नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या पथकाने पर्यावरणविषयक संशोधन अहवालात नमूद केला आहे. त्यांनी हा अहवाल पुणे महापालिकेला सोमवारी (दि.२५) सुपूर्त केला. अन्न, पाणी व ऊर्जा याविषयी नागरी जीवन पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध राहावे, या उद्देशाने त्यांनी पुण्याचा अभ्यास केला.
अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने हा अहवाल तयार करण्यात आला. त्यांनी गेली तीस वर्षे आणि पुढील तीस वर्षे असा कालावधी अभ्यासासाठी निवडला. त्यांच्या अंदाजानुसार उन्हाळ्यात पुण्याचे तापमान सध्यापेक्षा दोन डिग्रीने वाढणार आहे. तसेच, पावसाचे प्रमाणही सात टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे मोठे पूर आणि दुष्काळाची तीव्रता वाढेल. सध्याची शहरी भागातील ६० लाख लोकसंख्या ही २०५० साली १ कोटी १५ लाख होवून परिस्थिती गंभीर होईल.
