दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
बल्लारपूर
बल्लारपूर नगर परिषदेच्या हद्दीतील बल्लारपूर पेपर मिल (BGPPL) द्वारा नवीन गॅस प्लांटचे काम शासनाची कोणतीही परवानगी न घेता सुरू केलेले आहे. प्रदूषणाच्या विळख्यात असलेल्या बल्लारपूरला परत एकदा प्रदूषणाच्या जाळ्यात अडकविण्याचे काम बल्लारपूर पेपर मिल करीत आहे. बल्लारपूरच्या जनतेचा विचार करून सुरू असलेला गॅस प्लांट बंद करावा व शासनाची कोणतीही परवानगी न घेतलेल्या बल्लारपूर पेपर मिलच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी राजू झोडे यांनी आज केली आहे.
यापूर्वीच अनेक घातक प्लांट पेपर मिलने सुरू केलेले असून प्रदूषणात बल्लारपूर शहर संपूर्ण महाराष्ट्रात नंबर एक वर आलेले असल्याने बल्लारपूर येथील जनतेस कोणत्या ना कोणत्या आजारांचा सामना करावा लागत आहे.नवीन गॅस प्लांट लागल्यानंतर बल्लारपुरात प्रदूषणात कमालीची वाढ होऊन जनतेला येथे राहणे असह्य होणार आहे.स्थानिक नागरिकांना भोपाल सारख्या भयंकर कांडाचा परिणाम होऊ शकतो. या नंतर बल्लारपूरात कोणताही नवीन गॅस प्लांटची निर्मिती होवू देऊ नये अशी जनतेची एकमुखी मागणी आहे. तरी सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्यात यावे व बल्लारपूर पेपर मिलच्या अधिकाऱ्यांवर शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता गॅस प्लांट सुरू केले आहे.त्या बाबतीत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केली आहे. जर तात्काळ गॅस प्लांटचे काम बंद झाले नाही तथा त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनातुन प्रशासनाला देण्यात आला आहे. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे,संपत कोरडे, अनिरूप पाटील, जाकीर खान, स्नेहल साखरे, भूषण पेटकर व वंचितचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
